Sunil Tatkare on NCP Merger: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवारांना विलिनीकरण हवं होतं अशी भूमिका मांडली जात असतानाच दुसरीकडे अजित पवार गटाकडून मात्र त्याबाबत पुरेशी स्पष्टता दिली जात नाहीये. येत्या काही दिवसांत विलिनीकरण होईल, असा ठाम दावादेखील काहीजण करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. शिवाय, यावेळी त्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर राऊतांची टीका, तटकरे म्हणतात…

ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी ‘भाजपाने राष्ट्रवादी पक्ष गिळून टाकला’ अशा स्वरूपाची टीका केल्यानंतर त्यावर सुनील तटकरेंनी उत्तर दिलं आहे. “संजय राऊत काय म्हणतात त्याला फारसं महत्त्व मला द्यायचं नाहीये. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येकजण टीका-टिप्पणी करत असतो”, असं ते म्हणाले.

कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण?

दरम्यान, यावेळी सुनील तटकरेंनी विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रश्न उपस्थित केला. “विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत मी बोलणार नाही. पण इतर सहकाऱ्यांनी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्याआधीच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. पण विलिनीकरण कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात होणार होतं याची माहिती जर समजली तर त्याबाबत मला बोलता येईल”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष मजबूत आहे. त्यामुळे नेतानिवडीचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आहे”, असंही ते म्हणाले.

विलिनीकरणाबाबत ‘हो’ही नाही, ‘नाही’ही नाही!

यावेळी विलिनीकरण होणार की नाही? या प्रश्नावर सुनील तटकरेंनी कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही, पण त्याचवेळी निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे, असा सूचक उल्लेख मात्र त्यांनी केला. “आम्ही एनडीएमध्ये भाजपासोबत केंद्रात, राज्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत आहोत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका आम्ही घेतली. ती पुढे नेणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आता या विचारांशी सुसंगत म्हणजेच भाजपाप्रणीत एनडीएमध्ये येण्यासंदर्भातली भूमिका ज्यांना सोबत यायचंय त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले.

“आम्हीही अनुभवी, काम केलंय”, सूचक विधान!

दरम्यान, एकीकडे अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याची चर्चा असतानाच सुनील तटकरेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. “आम्ही स्वतंत्ररीत्या निवडणूक लढलो. जिंकून आलो. विलिनीकरणाबाबत निर्णय चर्चा सुरू होईल तेव्हा होईल. आमचं याहून वेगळं मत असण्याचं कारण नाही. आम्हीही दीर्घकाळ अजित पवारांसोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नव्याने घेतलेली भूमिका महाराष्ट्रात अंमलात आणण्यासाठी आम्हीही मेहनत घेतली आहे. आम्हीही दीर्घकाळ काम केलेलं आहे. २०१४ सालात मलाही शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमलेलं होतं. त्यामुळे आम्ही अननुभवी आहोत असं काही नाही”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार? यावर सध्या जोरदार तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.