राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. खासदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रशांत किशोर यांच्याबरोबर गुरुवारी एक महत्वाची बैठक झाल्याचं बोललं जात आहे. पण या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील नेते अनभिज्ञ असल्याची चर्चा आहे.

प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे की नाही? याबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं आहे. प्रशांत किशोर यांच्याबाबत आणि राष्ट्रवादीतील घडामोडींवर बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला रणनीतिकार किंवा सर्व्हेची गरज नाही’, असं सुनील तटकरे यांनी आज (७ ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमकं अर्थ काय? त्यांचा रोख नेमकं कोणाकडे? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

‘मला रणनीतिकार किंवा सर्व्हेची गरज नाही’

“आम्ही सर्वजण फिल्डवर काम करणारे आहोत, मी माझ्या आयुष्यात कधी निवडणुकीचा सर्व्हे केलेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी मतमोजणीच्या दिवशी रायगड लोकसभा मतदारसंघ हारणार असं अनेकजण सांगत होते. मला काही रणनीतिकार, सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डवर काम करणारा माणूस आहे. फिल्डवरवर काम करत असल्यामुळे आपल्याला काय वाटतं याचा अनुभव आहे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

“एखाद्या गावात गेल्यानंतर तेथे लोक भेटल्यावर त्यांना काय वाटतं? तरुणांना भेटल्यावर त्यांना काय वाटतं? याचे सगळे अनुभव येतात. शरद पवार आणि अजित पवार या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे. मी महाराष्ट्र आठ वेळा पालथा घातलाय. चांदा ते बांदा मी सांगू शकतो. त्यामुळे मला त्याची चिंता नाही. मला रणनितीकार किंवा सर्व्हेची गरज नाही, हे मी माझ्या स्वत:चं सांगत आहे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर यांच्याबाबत तटकरे काय म्हणाले?

“ते आता राजकीय रणनीतिकार जे आहेत, त्यांनी त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्ये जपलं आहे. ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही? हे मला ज्ञात नाही. सुनेत्रा पवार यांची आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली आहे. एक ते दीड महिन्यांपूर्वी त्यांची आणि आमची एकत्रितपणे भेट झाली होती. त्यामुळे हा भाग वेगळा झाला. मात्र, आम्ही आमच्या पक्षाचं संघटन राज्यात उभं करत असताना आम्ही सर्वजण नेहमी फिल्डवरवर काम करत असल्यामुळे जनतेला, तरुणांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना नेमकं काय हवंय? याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही त्या पद्धतीने पक्षाची बांधणी करत आहोत”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

“सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची केवळ सदिच्छा भेट झाली, म्हणजे लगेच त्यांना राष्ट्रवादीचा सल्लागार म्हणून नेमलं असा अर्थ काढणं चुकीचं आहे. ६ ते ७ तास भेट झाली, असं तुम्ही म्हणत आहात. तसेच त्या बैठकीत खासदार पार्थ पवार हे देखील होते, असं मी माध्यमांमधून ऐकलं. त्यामुळे याबाबत पार्थ पवारच स्पष्टपणे सांगू शकतील. मला असं वाटतंय की फक्त भेट झाली म्हणून लगेच पक्षाच्या रणनीतिकार म्हणून त्यांना नेमलं असं होत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर एनडीएमध्ये काम करत आहोत आणि काम करत राहणार”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.