महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ ला विमान अपघातात निधन झालं. यामुळे संपूर्ण राज्य हळहळलं. त्यांच्या निधनानंतर चर्चा सुरु झाल्या त्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या. याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विविध वेळा स्पष्टीकरण दिलं. आता पुन्हा एकदा या चर्चा सुरु झाल्या आहेत. जयंत पाटील आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे वर्षा बंगल्यावर भेटल्याची माहिती समोर आली आणि या चर्चांना पुन्हा उधाण आलं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दोन राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असेल तर चर्चा वर्षा बंगल्यावर का होईल?

दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार असेल तर त्याची चर्चा वर्षा बंगल्यावर का केली जाईल? मला हे कळत नाही. स्वर्गीय अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती का? तर हो झाली होती. ती चर्चा अखेरच्या टप्प्यातही गेली होती. जर अजितदादांचं निधन २८ जानेवारीला झालं नसतं तर कदाचित १२ किंवा १५ फेब्रुवारीच्या आसपास दोन्ही पक्षांचं विलीनीकरण झालं असतं. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी या दोन तारखा ठरल्याचं सांगितलं होतं. कदाचित त्या तारखांपैकी एका तारखेला विलीनीकरण झालं असतं. पण अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणे बदललं आहे. मधल्या कालावधीत सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाचा मुद्दा संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अशा प्रकारची कुठलीही चर्चा आज नाही. शरद पवारांच्या पक्षाकडून या प्रकारच्या चर्चा बंद झाल्या आहेत. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा करण्यात अर्थ नाही. जर प्रस्ताव आला तर त्यावेळी पाहता येईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समीकरणं बदलली-सुनील तटकरे

विलीनीकरणाच्या चर्चा अजित पवार यांनी त्यांच्या पातळीवर पूर्ण केल्या होत्या. अजितदादा आमचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय नेते होते. त्यामुळे चर्चा करण्याचा अधिकार त्यांना होता. अशा चर्चा सुरु आहेत याबाबतची माहिती मला दादांनी त्यावेळी दिली होती. पण या सगळ्या चर्चा अखेरच्या टप्प्यात आल्या असत्या तर दादांनी कदाचित याबाबत सगळ्यांनाच कल्पना दिली असती. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत त्यामुळे आता विलीनीकरणाचा विषय समोर नाही असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील आणि आमची भेट वर्षा बंगल्यावर झाली नाही-तटकरे

जयंत पाटील आणि आमची वर्षा बंगल्यावर भेट झालेली नाही. जयंत पाटील हे त्यांच्या कारणासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. त्याबाबत त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. मी भेटीची वेळ मागितली होती. जी भेट झाली ती राजकीय भेट नव्हती. त्यातले तपशील काय सांगणार? आमच्या कोअर कमिटीची चर्चाही यानंतर झाली. २२ तारखेला दादांची जयंती आहे. त्याबाबत आम्ही चर्चा केली, इतर गोष्टींची चर्चा केली. दादांबाबत जो आदर आमच्या मनात आहे तोच आदर आमच्या मनात सुनेत्रा वहिनींबाबत आहे. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.