scorecardresearch

अकोल्याच्या ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाची अडगळ ; मंत्र्यांच्या घोषणा हवेतच; लोकार्पणाची प्रतीक्षा

शहरातील ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू करण्याचा प्रश्न गत तीन वर्षांपासून रेंगाळला.

अकोल्यात उभारण्यात आलेली रुग्णालयाची इमारत.

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : केंद्र शासनाच्या योजनेतून वैद्याकीय शिक्षण विभागाने शहरात उभारलेले ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय करोनाच्या गंभीर संकटात निरुपयोगी ठरत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व पालकमंत्री बच्चू कडू यांनी वारंवार प्रशासनाला हे रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले. लवकरच ते रुग्णसेवेत दाखल होईल, असेही त्यांनी अनेकवेळा जाहीर केले. मात्र, प्रशासनाने या आदेशांना केराची टोपली दाखवली असून मंत्र्यांच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. ‘सुपर स्पेशालिटी’ ची सुसज्ज इमारत व यंत्रसामुग्री गत तीन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाच्या लोकार्पणाची  प्रतीक्षाच आहे.

जानेवारी महिन्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढू लागली. करोनाचा गंभीर धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज आहे. शहरातील ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू करण्याचा प्रश्न गत तीन वर्षांपासून रेंगाळला. गेल्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर पुन्हा एकदा हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी लवकरात-लवकर हे रुग्णालय सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला नुकतेच दिले. या अगोदरही त्यांनी रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात अनेक वेळा आदेश दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अकोल्यातील ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्याला मे २०२१ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्या सुसज्ज इमारतीमध्ये ना कोविड रुग्णालय सुरू झाले, ना अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू झाले. अकोल्यासोबतच औरंगाबाद, यवतमाळ व लातूर जिल्ह्यात सुपर स्पेशालिटीसाठी उभारलेल्या इमारतीचा लाभ कोविडच्या पहिल्या लाटेपासून करोना रुग्णालयासाठी करण्यात आला.

अकोल्यात मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभावाने कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत केवळ शोभेची वस्तू बनली आहे. एकीकडे अत्याधुनिक सोयी-सुविधांअभावी गरीब रुग्णांना आपले जीव गमवावे लागत असतांना दुसरीकडे सुपर स्पेशालिटीची कोटय़वधींची संत्रसामुग्री धूळ धात पडून आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या फेज-तीन अंतर्गत अकोला, यवतमाळ, लातूर आणि औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे. यासाठी प्रत्येकी १५० कोटींचा निधी मिळाला. त्यापैकी १२० कोटी केंद्र तर ३० कोटी राज्य शासनाचा वाटा आहे.

अकोल्यातील इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन साधारणत: तीन वर्षांचा कालावधी लोटला. वास्तविक पाहता अकोल्यात ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू होण्याची नितांत गरज आहे.

या रुग्णालयात नॉनकोविड गंभीर व्याधीग्रस्त रुग्णांवर अतिविशेषोपचार झाले असते. गंभीर करोनाबाधित रुग्णांवरही त्या ठिकाणी विशेष उपचार करून जीव वाचवता आला असता. मात्र, शासनाच्या उदासीन व वेळकाढू धोरणामुळे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाचे लोकार्पण रखडले असून रुग्ण अत्याधुनिक आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत.

बच्चू कडूंचा  इशारा

पालकमंत्री बच्चू कडू यांनी सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात नुकतीच प्रशासनाची बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला. तात्काळ कंत्राटी तत्त्वावर पदभरती करून एका महिन्याच्या आत सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा ‘अल्टीमेटम’ पालकमंत्री बच्चू कडू यांनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिला आहे.

माजी पालकमंत्र्यांचे आंदोलन

सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या प्रश्नावर माजी पालकमंत्री आ.डॉ.रणजीत पाटील यांनी गेल्या आठवडय़ात आत्मक्लेश आंदोलन केले. भाजप शासनाच्या काळात सुसज्ज इमारत उभारून यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली असताना महाविकास आघाडी सरकार सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Super specialty hospital in akola waiting for inauguration zws

ताज्या बातम्या