पुण्यात डीजे आणि लाऊड स्पीकर विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांचा सत्कार अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मधुरजग प्रतिष्ठान आणि ब्राईट्स सोसायटी तसंच विचारवेध यांच्यातर्फे विद्यानंद बापट यांच्या या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी सुमीत राघवनने विद्यानंद बापट यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच तुम्ही पुढे लढत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत असंही सुमीत राघवनने म्हटलं आहे.

सुमीत राघवनने काय म्हटलं आहे?

आम्ही भूमिका करणारे आहोत, पण आता भूमिका घ्यायला लागलो आहोत. मी आणि चिन्मयी आम्ही दोघंही. कारण सतत एक निर्माता, दिग्दर्शक आणि सहकलाकार फार तर तीन तास तग धरतात. शेवटी आपण माणूस म्हणून काय करतो हे फार महत्वाचं ठरतं. विद्यानंद बापट यांनी जो यज्ञ सुरू केला त्यात आपण सगळ्यांनी सढळ हाताने विद्यानंद बापट यांना साथ देणं गरजेचं आहे. आपण ते आत्ता करतोच आहोत पण हे खूप आधी करणं गरजेचं होतं.

विद्यानंदची हेटाळणी करणं गैर आहे-सुमीत राघवन

सुमीत राघवनने पुढे म्हटलं आहे, मी माझ्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की विद्यानंदचे फोटो लावून, बॅनर लावून हेटाळणी केली जाते आहे किंवा डीजे वाजवले जात आहेत. या गोष्टीला खरंच काहीही अर्थ नाही. जेव्हा तुम्ही तार्किकदृष्ट्या किंवा वैचारिक दृष्ट्या या गोष्टींचा सामना करू शकत नाही तेव्हा तुम्ही असं काहीतरी थातूरमातूर करता. मला एवढंच म्हणायचं आहे की, धर्म असू दे, सण असू दे, हा घरापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे, जर आपल्या मुली, आपली मुलं, वर्ल्ड कप जिंकून आली, तर सर्वांनी मिळून जल्लोष करू. आपण सर्वांनी मिळून रस्त्यावर नाचूया, दुसरे करतात म्हणून आपण नको करायला, आपण भविष्याचा विचार करूया आणि आपल्यामध्ये काय काय चुका आहेत, ते आपण सुधारणे फार गरजेचे आहे, मी विद्यानंदाचे आभार मानतो आणि त्याचे अभिनंदन करतो. त्याला काहीही फरक पडत नाही.

दोन प्रकारची माणसं असतात

दोन प्रकारची माणसं असतात, एक डोळ्यात डोळे घालून बोलतात, त्यांची भीती वाटते आणि दुसऱ्या प्रकारची माणसं खाली बघत असतात, त्यांच्या मनात काय चाललंय हे कळतं नाही, विद्यानंद फक्त असं खाली बघत असतो, पण विद्यानंदाच्या मनात काय चाललंय हे लगेच कळतं, त्यामुळे मी आणि चिन्मयी त्याला इतकं बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काही बोलत नाही. तो आपल्या मोबाईलमध्ये आत्ताही बिझी आहे, माणसाने थोडा वेडा असावाचं लागतं असं काहीतरी करायला, विद्यानंदमध्ये एक वेगळ्या प्रकारचा वेडेपणा आहे आणि मला असं वाटतं त्याचा परिणाम आता सर्वांवर पडला आहे, आणि हा आता जो जागर सुरू झालेला आहे, तो असाच वाढत जावा आणि आपल्या आयुष्यात शांतता राहावी, आयुष्यात फार मोठी काम आहेत करायला, रस्ते अजून बरे नाहीत आपल्याकडचे, असंख्य काम आहेत, तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, तिकडे तो जोश आहे तो सत्कारणी लावला पाहिजे, आम्ही तिघांनी मिळून निषेध म्हणून काळ घातलेला नाही तर हा योगायोग आहे, असेही मिश्किलपणे सुमित राघवन याने बोलताना म्हटलं आहे. तर विद्यानंद हे कार्य पुढे असंच चालत राहू दे, आम्ही तुझ्यासोबत आहेत, तुझ्या पाठीशी नाही तर तुझ्याबरोबर आहोत, असंही सुमित राघवन याने पुढे म्हटलं आहे.