Shiv Sena Symbol Supreme Court Hearing, Shinde Faction Majority Test: शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर संघर्ष सुरू आहे. आज एकनाथ शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करण्यात आले. “एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन गटांमधील मतभेद केवळ विधिमंडळ पक्षापुरते मर्यादित नसून, पक्षाच्या मूळ रचनेपर्यंत पोहोचले होते. पक्षाची संघटनात्मक आणि विधिमंडळ शाखा या दोघांमध्ये घनिष्ठ संबंध असल्याने निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे,” असा युक्तिवाद शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी न्यायालयात केला.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर शिवसेनेतील फुटीशी संबंधित याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
विधिमंडळ आणि मूळ पक्ष वेगळे नाहीत
कौल यांनी न्यायालयाचे लक्ष जून २०२२ मधील घडामोडींकडे वेधले. त्यावेळी दोन्ही गटांनी घेतलेल्या स्वतंत्र बैठका, गटनेता आणि मुख्य प्रतोद यांच्या समांतर नियुक्त्या तसेच एकमेकांविरुद्ध सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईचा दाखला त्यांनी दिला.
“पक्षाची विधिमंडळातील ताकद आणि मूळ संघटना या दोन वेगळ्या गोष्टी असू शकत नाहीत, त्या परस्परांशी घट्ट जोडलेल्या आहेत, हा निवडणूक आयोगाचा निष्कर्ष वस्तुस्थितीला धरून आहे,” असे कौल म्हणाले.
तसेच, “विधिमंडळातील सदस्याला अपात्र ठरवले तरी त्याचे पक्षातील सदस्यत्व रद्द होत नाही. विधानसभा अध्यक्षांचे अधिकारक्षेत्र हे सदस्याने स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे की नाही, हे ठरवण्यापुरते मर्यादित असते; त्याचा पक्षावर दावा सांगण्याच्या निवडणूक आयोगासमोरील अधिकारावर कोणताही परिणाम होत नाही,” असेही ते म्हणाले.
संख्याबळाची चाचणी आजही वैध
‘सादिक अली’ खटल्याचा संदर्भ देत कौल यांनी स्पष्ट केले की, दहाव्या परिशिष्टाच्या (पक्षांतरबंदी कायदा) आधी हा निकाल लागला असला, तरी विधिमंडळ बहुमताची चाचणी आजही वैध ठरते. “निवडणूक आयोग प्रत्येक वादात एकाच चाचणीचा अवलंब करेल असे नाही; प्रकरणातील तथ्यांनुसार योग्य चाचणी ठरवण्याचा अधिकार आयोगालाच आहे. अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना इतर चाचण्या निष्फळ ठरत असतील, तर आयोगाने विधिमंडळातील बहुमताचा आधार घेतला. ही निवड अयोग्य कशी ठरू शकते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे गटाचे ‘पक्षप्रमुख’ पद अलोकतांत्रिक
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर पक्षपातीपणाचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटावर निशाणा साधताना कौल म्हणाले, “आयोगाने कोणताही नवा न्यायप्रणालीचा पायंडा पाडलेला नाही. शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये करण्यात आलेली दुरुस्ती आयोगाकडे कधी सादरच करण्यात आली नव्हती. सादर केलेली पत्रे केवळ प्रतिनिधींच्या निवडीची माहिती देणारी होती. शिवाय, २०१८ च्या या घटनेनुसार ‘पक्षप्रमुख’ पदाला एकाधिकारशाहीचे अधिकार देण्यात आले होते. कोणत्याही पदाधिकाऱ्याची मनमानी नियुक्ती किंवा हकालपट्टी करण्याचे सर्वाधिकार एकाच व्यक्तीकडे होते. यामुळे पक्षाचा अंतर्गत लोकशाही ढाचा पूर्णपणे ढासळला होता, ज्यामुळे आयोगाला संघटनात्मक बहुमताऐवजी विधिमंडळातील बहुमताचा निकष लावावा लागला.”
