scorecardresearch

“जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह, कारण…”, डॉ. आंबेडकरांचा संदर्भ देत माजी न्यायमूर्ती हेमंत गोखलेंचं विधान

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देत जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह आहे, असं मत व्यक्त केलं.

“जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह, कारण…”, डॉ. आंबेडकरांचा संदर्भ देत माजी न्यायमूर्ती हेमंत गोखलेंचं विधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देत जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह आहे, असं मत व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या अंनिवा वार्षिक विशेषांकांच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात डॉ. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्वाविषयी विचार’ या विषयावर हेमंत गोखले बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बंधुत्वाची कल्पना स्पष्ट करताना हेमंत गोखले म्हणाले, “न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या संविधानाच्या घोषवाक्यातील “बंधुता” हे मूल्य प्रत्यक्षात यावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी घटनेत अस्पृश्यता निर्मूलन, दलितांना प्रतिनिधित्व आणि आरक्षण याबाबतची कलमे समाविष्ट केली.”

“जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह”

“संविधान सभेतील एका भाषणात बाबासाहेब म्हणतात, ‘जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह आहे. कारण भारतातील जातीव्यवस्थेमुळे समाजात भेदभाव निर्माण होतो. आपसात विरोधी भावना तयार होतात. बंधुभाव नष्ट होतो आणि बंधुभाव नसेल, तर स्वातंत्र्य आणि समतेला काहीही अर्थ राहत नाही.’ ही विषमता मनुस्मृतीत असल्यामुळेच डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली,” असं मत माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केलं.

“गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांचा समन्वय साधण्याची गरज”

आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय साधण्याची गरज असल्याचे मतही हेमंत गोखलेंनी व्यक्त केले. ते म्हणाले, “ज्या मंदिरात दलितांना प्रवेश नसे त्या मंदिरात महात्मा गांधी जात नसत. एवढेच नाहीतर महात्मा गांधींनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. ते स्वतः आंतरजातीय विवाह असेल अशाच विवाहांना हजेरी लावत आणि आशीर्वाद देत.”

“केवळ आर्थिक विषमताच नव्हे तर जाती जातीतील विषमता भेदभाव नष्ट होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील बंधुता कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज गांधींचा आचार आणि डॉ. आंबेडकरांचा विचार यांची सांगड घातली पाहिजे,” असंही गोखले यांनी नमूद केलं.

हेही वाचा : विश्लेषण : “मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही”, आपच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला त्या डॉ. आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा कोणत्या?

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये राजीव देशपांडे यांनी अंनिस वार्षिक अंकातील विविध लेखाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन राहुल थोरात तर आभार अनिल चव्हाण यांनी मांडले. या ऑनलाइन कार्यक्रमाला प्राचार्या प्रमोदिनी मंडपे, दिपक गिरमे, डॉ. हमीद दाभोलकर, अॅड. अतुल अल्मेडा, डॉ. अरुण बुरांडे, गणेश चिंचोले, प्रा. प्रविण देशमुख यांचेसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:45 IST

संबंधित बातम्या