Shiv Sena Split Supreme Court Hearing Updates: शिवसेना पक्षातील फुटीनंतर निर्माण झालेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या आणि पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या १० जानेवारी २०२४ रोजीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या निर्णयात विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना दहाव्या अनुसूचीअंतर्गत अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. याच प्रकरणाशी संबंधित याचिकेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयालाही आव्हान दिले आहे, ज्यात शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी ‘राणा’ प्रकरणाचा दाखला देत अपात्रतेची कारवाई पूर्वलक्षी पद्धतीने लागू होते, असा दावा त्या निकालाने केलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकरणात आधी आमदारांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर पक्षात फूट पडली. अध्यक्षांनी आधी फुटीचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने मात्र अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. अपात्रतेची याचिका दाखल झाली त्या वेळी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीच्या आधारे निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते.

कौल यांनी ‘सुभाष देसाई’ प्रकरणाचाही उल्लेख करत अपात्रता ही पूर्वलक्षी नसून भविष्यात लागू होणारी कारवाई असल्याचे स्पष्ट केले. ‘शिवराज सिंह चौहान’ प्रकरणात अपात्रतेची याचिका दाखल होताच संबंधित आमदाराला सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र, अपात्रता प्रत्यक्षात ठरत नाही तोपर्यंत परिस्थिती अनिश्चित असते आणि निवडून आलेल्या प्रतिनिधीला त्याचे घटनात्मक अधिकार बजावण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिल्याचे कौल यांनी सांगितले.

दहाव्या अनुसूचीअंतर्गत ‘खरा राजकीय पक्ष’ कोणता, हे ठरवण्याच्या मुद्द्यावरही कौल यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन गट निर्माण झाल्यानंतर कोणता गट मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, हे प्रथम ठरवणे आवश्यक आहे. पक्षाची घटना आणि नेतृत्वाची रचना याचा विचार विधानसभा अध्यक्षांनी करायला हवा. दोन्ही गटांकडून पक्षघटनेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या सादर झाल्यास, फुटीपूर्वी दोन्ही गटांच्या संमतीने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या घटनेचा आधार घ्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.

‘हा संख्याबळाचा खेळ नाही’

विशेष म्हणजे, ‘हा केवळ संख्याबळाचा खेळ नाही’, असे कौल यांनी स्पष्ट केले. केवळ विधानसभेतील कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत, यावरून राजकीय पक्ष कोणता हे ठरवता येणार नाही. विधानसभेबाहेरील पक्षाची नेतृत्व रचना आणि संघटनात्मक स्वरूपही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

न्यायमूर्ती बागची यांनी सुनावणीदरम्यान निवडणूक चिन्ह आणि पक्षावरील अधिकाराबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. राजकीय पक्षाचे खरे प्रतिनिधित्व कोण करतो, हे ठरवताना संघटनात्मक चाचणी आणि आमदारांचे संख्याबळ या दोन्हींच्या मर्यादा असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत कौल यांनी संविधानातील कलम ३२४ चा आधार घेतला. निवडणूक आयोगाला घटनात्मक उद्देश प्रभावीपणे साध्य करण्यासाठी व्यापक अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना फुटीच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेचा निर्णय, पक्षाची खरी ओळख, व्हीपचा अधिकार आणि निवडणूक चिन्ह यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.