Supreme Court Shiv Sena Case: शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. बुधवारी याबाबत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. आज पुन्हा दुपारी दोन वाजता या खटल्यावर सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना उबाठा गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांनी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेत चलबिचल सुरु झाल्याचे वक्तव्य केले आहे. शिंदेसेनेत भाजपा अथवा प्रहारमध्ये विलीन करण्याबाबत खल सुरु असल्याचा दावा राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला.
सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
“विधिमंडळातील पक्ष फुटला म्हणून मूळ पक्षात फूट पडली असे म्हणता येत नाही असे कपिल सिब्बल यांनी काल सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या मनात असणाऱ्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले. एका चिन्हावर निवडून आलेले लोक कोणत्याही कायद्याचं, संविधानाचे आणि १० व्या सूचीचे बंधन न पाळता सत्तेत जाऊ लागले तर या देशाच्या संविधानाला, लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. म्हणून न्यायालयाने पुढाकार घेऊन यांच्यावर कायद्याचे बंधन घालायला हवं. शिवसेना पक्ष अजिबात फुटलेला नाही, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ पक्षात फूट नक्कीच पडलीय, पण, मूळ पक्ष फुटलेला नाही त्यामुळे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडेच राहावं किंवा राहिल अशी भूमिका काल आमच्या वकिलांमार्फत न्यायालयात मांडण्यात आली”, असे संजय राऊत म्हणाले.
ऐतिहासिक खटला
“देशातील एक ऐतिहासिक खटला, संविधानाच्या दृष्टीने महत्वाचा खटला सुरु असल्याचे जाणीव न्यायालयाला असल्याचे जाणवले”, असेही संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. या खटलेचे देशावर दूरगामी परिणाम होणार असल्याची जाणीव न्यायाधीशांना आहे, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, कायदा त्याचं काम करेल, संविधान त्याचं काम करेल. बेईमानी आणि घटनेशी द्रोह करणाऱ्यांना आम्ही कायद्याच्याच माध्यमातून संपवू, असे संजय राऊत म्हणाले. “आज देखील कपिल सिब्बल बाजू मांडतील आणि त्यांच्या (शिंदेसेनेच्या) वकिलांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल”, असे राऊत म्हणाले.
विलिनीकरणाबाबत शिंदेसेनेत खल- राऊतांचा दावा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगटात चलबीचल सुरु झाल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले. “समोरच्या बाजुला चलबिचल सुरु आहे. भाजपात विलीन व्हावे किंवा अलिकडेच पक्षात घेतलेल्या प्रहारमध्ये, विलीन व्हायचं याबाबत त्यांच्यामध्ये खल सुरु आहे. लवकरच या गटाचे नेते दिल्लीत येऊन त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह यांच्याशी चर्चा करतील. पण, संविधान मान्य केले आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय न्यायालयाने फेटाळून लावला तर हा देशातील जनतेचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असेल”, असे संजय राऊत म्हणाले. शिंदे गटाने आमच्यामागे महाशक्ती असल्याचा केलेला उल्लेख देखील न्यायालयाच्या रेकॉर्डवर आल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
