Supriya Sule at Shivsena MNS Victory Rally : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केली होती. तसेच त्रिभाषा सूत्र स्वीकारलं होतं. मात्र, तमाम मराठी जनतेने या निर्णयाचा विरोध केला. यासह शिवसेना (ठाकरे) व मनसेने देखील याविरोधात मोर्चाची हाक दिली होती. आज (५ जुलै) हा मोर्चा काढला जाणार होता. मात्र, जनतेचा रोष पाहून फडणवीस सरकारने दोन्ही शासन निर्णय मागे घेतले. परिणामी शिवसेना (ठाकरे) व मनसेने आंदोलनाच्या दिवशी विजयी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. मुंबईतील वरळी येथे हा विजयी मेळावा पार पडला. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या मेळाव्याला उपस्थित राहत सर्वांना संबोधित केलं. तसेच मराठी भाषेसाठी आपली एकजूट अशीच कायम राहू द्या असं आवाहन जनतेला केलं.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने १८ वर्षांनंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ राजकीय मंचावर एकत्र आले होते. तसेच त्यांचं कुटुंब देखील यावेळी उपस्थित होतं. या कार्यक्रमानंतर अमित ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे देखील एकत्र दिसले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं.
कार्यक्रम संपल्यानंतर सूत्रसंचालक अजित भुरे यांनी अमित व आदित्य ठाकरे यांना मंचावर बोलावलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही भावांच्या हाताला धरून एकमेकांच्या बाजूला उभं केलं. तसेच दोघांनाही त्यांच्या काकांच्या बाजूला उभं करून प्रसारमाध्यमांना एक कौटुंबिक फोटो मिळेल याची काळजी घेतली. सुप्रिया सुळे यांनी अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या शेजारी, तर आदित्य यांना राज यांच्या शेजारी उभं केलं. तसेच कार्यक्रमानंतर अमित व आदित्य ठाकरे यांनी हातात हात घालून विजयाचा जल्लोष केला.

विविध पक्षांची एकजूट
या विजयी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे नेते जयंत पाटील, कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर व भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.