Supriya Sule Election Commission Allegations: खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्रात दोन पक्ष फोडल्याचा आरोप केला. बाळासाहेब हयात असताना त्यांनी पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे सोपवली तर, शरद पवारांनी स्वत: राष्ट्रवादीची स्थापना केली. पण, दोन्ही पक्षांचे विभाजन करुन मालकी, चिन्ह दुसऱ्यांना देण्यात आले, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुळे यांनी महिला आरक्षणाचे विधेयक २०२३ मध्येच मंजूर झाल्याचेही स्पष्ट केले.
गव्हर्नर आणि न्यायपालिकांवर भाष्य
“भाजपा सरकराच्या काळात अनेक आरबीआयच्या गव्हर्नर्सनी राजीनामे दिल आहेत. त्यांचा विरोध करण्याचा प्रश्नच नाही, त्यांनीच राजीनामे दिलेत आम्ही कधीच मागणी केली नाही”, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. “न्यायपालिकेबाबत आम्ही कधीच गैरवर्तन केले नाही. न्यायाधीशाच्या घरात नोटा सापडल्या त्याच्या विरोधात सरकारने काय कारवाई केली? एवढाच प्रश्न आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. निवडणूक आयोगाचे सर्वात मोठा पीडित महाराष्ट्र असल्याचे सुळे म्हणाल्या. कागदपत्र आमच्या बाजूने असताना दोन पक्ष फोडण्यात आले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिवसेना, राष्ट्रवादी फुटीवर भाष्य
“बाळासाहेब हयात असताना ज्या पक्षाची स्थापना झाली. माझ्यानंतर या पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल असं सांगून, त्यांना त्या पदावर बसवून बाळासाहेब असताना हा निर्णय झाला होता. असे असताना त्यांना पदावरुन हटविण्यात आले व त्यांच्याकडून पक्ष काढून घेण्यात आला. आमच्याही बाबतीत तसेच झाले. स्वत: शरद पवार संस्थापक असताना, सर्व कागदपत्र आमच्या बाजूने असताना राष्ट्रवादीचे विभाजन झाले. स्थापना केली त्यांना रस्तावर टाकले, त्यांना काही देणार नाही असं सांगितले आणि पक्षाचे चिन्हा दुसऱ्याला दिले”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
न्याय मिळाला नाही – सुळे
पक्षाची स्थापना केली त्या माणसाला काही देणार नाही सांगितले. त्याला कोर्टात उभं केलं. ८० वर्षांच्या माणसाला काही केलं नाही असं सांगून त्रास देण्यात आला. कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या. पक्ष स्थापन करणाऱ्या माणसालाच हद्दपार केले, ही कोणती लोकशाही? अशा शब्दात सुळे यांनी संताप व्यक्त केला. यावेळी सुळे यांनी राज ठाकरे यांना पक्ष स्थापन करण्याचा निर्णय जास्त योग्य असल्याचे मत मांडले. सहा दशकं महाराष्ट्र आणि देशात राजकारण, समाजकारण करणाऱ्या शरद पवारांना न्याय मिळाला का? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार – मी घराणेशाहीचे प्रोडक्ट – सुळे
शरद पवारांनी ऐंशीव्या वर्षी शून्यातून विश्व उभं केलं, त्यांचा कोणी काका-मामा आमच्यासारखा नव्हता. ते घराणेशाही नाहीत, दादा आणि मी घराणेशाहीतील आहे. दादा असताना देखील मी हे म्हणत होते की दादा आणि मी घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहोत. पण, शरद पवार हे परिवारवाद नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्याच ८० वर्षांच्या योद्धाला पक्षातून काढून टाकण्यात आले. का आम्ही निवडणूक आयोगाचा विरोध करायचा नाही? आम्हाला न्यायच मिळाला नाही, अशा शब्दात सुळे यांनी प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला. आताही कोर्टात लढाई सुरु असल्याचे सुळे यांनी नमूद केले.
