Supriya Sule on Parth Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानमुळे ही जागा रिक्त झाली होती. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता प्रयत्न सुरू होते. मात्र, काँग्रसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पोटनिवडणुकीतील बिनविरोध निवडीची परंपरा खंडित झाली आहे. दरम्यान, यावरून राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय अशा शब्दांत पार्थ पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावरून आता पार्थ पवारांवरच टीका होऊ लागली आहे.
पार्थ पवार काय म्हणाले होते?
बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने अशोक मोरे यांना उमेदवारी दिली. याबाबत पार्थ पवार म्हणाले, “बिनविरोधासाठी कोणाबरोबरही बोलणं झालेलं नाही. काय करायचं हे त्यांना कळायला हवं. ते काय करत आहेत हे सर्वांना माहितेय. त्यांना नंतर काय त्रास होईल हे महाराष्ट्रात दिसेल. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काही नशिबात असेल ते होईल. फक्त मला याचं वाईट वाटतंय की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे”, असं पार्थ पवार म्हणाले होते.
पार्थ पवारांवर शरद पवारांची टीका
तिसऱ्या टर्मची राज्यसभेत सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी दिल्लीतून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पार्थ पवारांच्या या वक्तव्याविषयी विचारण्यात आलं. कारण, शरद पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिल्याचं स्पष्ट होतंय. शरद पवार स्मितहास्य करत म्हणाले, “राजकारणात वक्तव्ये करण्यासाठी परिपक्वता लागते. ती कितपत त्यांच्याकडे आहे हे मी आज सांगू शकत नाही.”
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष फार जवळून पाहिला आहे. अनेकवेळा आणि यावेळीही काँग्रेस पक्षाच्या बरोबरीने लढले आहे. काँग्रेस विचारधारेच्या तालमीत मोठे झाले आहोत. या देशावर इंग्रज राज्य करत होते, याच काँग्रेस पक्षाने हे स्वातंत्र्य दिलं. काँग्रेस पक्षाचं योगदान मोठं राहिलं आहे. महिला आरक्षण, युद्ध, इकॉनॉमिक पॉलिसी, चलेजावचा नारा काँग्रेसनेच केला. कोणताही पक्ष सशक्त लोकशाहीत लहान मोठा असू शकतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवारांनी पार्थ पवारांच्या परिपक्वतेविषयी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शरद पवार कर्तुत्वाने, वयाने, नात्याने माझ्यापेक्षा मोठे आहेत. मोठ्यांनी एकदा बोलल्यावर आपण काहीच बोलायचं नसतं, अशा संस्कारात मला वाढवलं आहे. कौटुंबिक सल्ला मी चॅनेलवर देणार नाही, तो मी घरात देईन.”
काँग्रेसने पार्थ पवारांवर टीका केली आहे. पार्थ पवार हे कृतघ्न आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळेंना विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या, “हा प्रश्न मला विचारण्याऐवजी अजित पवार पक्षातील नेत्यांना विचारलं पाहिजे.पार्थ पवारांनी मांडलेली भूमिका हे त्यांच्या पक्षाचं ते मत असेल, त्यांचं काय मत आहे याबाबत त्यांच्या गटाने बोललं पाहिजे.”
