कराड : माजी उपपंतप्रधान (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हे स्वप्न होतं, पण दुर्दैवाने आज सत्ता एकाच ठिकाणी एकवटली जात असून, हे लोकशाहीसाठी हानिकारक असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीदिनी आज त्यांच्या समाधीस्थळी शिष्टाचाराचा अभाव दिसल्याबाबत कोरडे ओढताना, मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटून आणि लेखीपत्र देवून हा प्रकार त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
दिवंगत ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून, अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजीमंत्री बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सुवर्णा पाटील, राजेंद्र यादव आदींची उपस्थिती होती.
चव्हाणसाहेबांचा मानसन्मान राखणे राज्याची जबाबदारी
माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही. परंतु, त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे प्रशासनाने आज केलेले दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, पत्रही लिहिणार आहे. सरकारे येतात- जातात पण, काही परंपरा पाळायलाच हव्यात. चव्हाणसाहेबांचा योग्य मानसन्मान राखणे ही राज्याची जबाबदारी आहे. भारत- चीन युध्दावेळी “आला हिमालयावर घाला, तिथे सह्याद्री धावून गेला” अशी तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाणांची ख्याती असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अभिवादनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत सुळे म्हणाल्या, ते कामात व्यस्त असतील. परंतु, प्रशासन मात्र, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा पाळण्यास बांधील आहे. यावेळी प्रशासनाकडून झालेली चूक प्रकर्षाने जाणवत असल्याचे त्या म्हणाल्या.
तिजोरीची चावी जनतेकडेच
उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘निधीच्या चाव्या’ संदर्भातील वक्तव्यांवर सुळे म्हणाल्या, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगात असताना, सत्ताधारी अन् विरोधकांकडून टीका- टिप्पणी सुरू असतेच. मात्र, राज्याच्या तिजोरीची चावी कोणत्याही नेत्याकडे नसून, ती पूर्णपणे जनतेकडेच आहे. लोकशाहीत हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिल्याचे त्या म्हणाल्या.
मुंडेंच्या विधानाचा जाहीर निषेध
परळीतील सभेत माजीमंत्री धनंजय मुंडेंनी बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराडची आठवण काढल्याबाबत विचारले असता, खासदार सुळे म्हणाल्या, अशा गुन्हेगारांना खरेतर, फाशीच द्यायला हवी. आणि त्यांची आठवण एखाद्या नेत्याला होत असेल, तर त्याचा जाहीर निषेधच आहे. तसेच अशा प्रवृत्तींचे समर्थन करणारे नेते कोणत्याही पक्षातील असोत, त्यांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे. अशा विधानांनी महाराष्ट्राच्या ऐक्यास बाधा पोहोचत असल्याची टीका त्यांनी केली.
हे तर, महाराष्ट्राचे दुर्दैव
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्याच नव्हेतर, शिक्षक, शासकीय कामांचे ठेकेदार यांच्याही आत्महत्या होत असून, शिक्षक व या ठेकेदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार, मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देवून सत्तेत आलेत. पण, दर तीन तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असताना, योग्यवेळी कर्जमाफी देणार असे जर, मुख्यमंत्री व काही मंत्री म्हणत असतीलतर हे महाराष्ट्राचे दुर्दैवच असल्याचीही टीका सुळे यांनी केली.
शिवेंद्रराजेंचा मूळ पक्ष आठवत नाही!
सातारा पालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवार ‘आयात’ करावा लागला, या मंत्री शिवेंद्रराजेंच्या टीकेवर सुळे म्हणाल्या, टीका करणारे आधी कोणत्या पक्षात होते, हे त्यांनाच आठवत नाही. त्यांचा मूळ पक्ष मलाही नीट आठवत नसल्याची खोचक टिपण्णी सुप्रिया सुळे यांनी केली.
शशिकांत शिंदे म्हणाले, साताऱ्यातील दोन्ही राजांच्या भूमिकेबद्दल मी बोलत नाही. पण, नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा पाटील या एक महिला सक्षमपणे उभ्या असून, त्यांचे कर्तृत्व मोठे असल्याने जनताच योग्य कोण ते ठरवेल.
