Supriya Sule shares an emotional Raksha Bandhan Post: रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली आहे. सात महिन्यांपूर्वी अजित पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबाबरोबरच अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या निधनानंतरच्या या पहिल्याच रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे मोठ्या भावासाठी भावनिक झाल्या असून त्यांनी अजित पवारांच्या आठवणीत एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे.

अजून विश्वास बसत नाही – सुप्रिया सुळे

अजित पवारांची आठवण काढताना ते हयात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचं सुप्रिया सुळे पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत. “आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा विमान अपघात झाला त्या दिवशाची आठवण अजूनही ताजी असल्याचं नमूद केलं.

“आजही वाटतं तू येशील अन् राखी बांधून घेशील”

“लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांविषयीच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

“तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे”, असंही त्यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे-विजय वडेट्टीवार वादाची चर्चा

दरम्यान, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळे व काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा उल्लेख केल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळेंनी वडेट्टीवारांना आव्हान दिलं होतं. वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा पुरावा सादर करावा किंवा माफी मागावी अशी संतप्त पोस्ट सुप्रिया सुळेंनी शेअर केली होती. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी लागलीच आपल्या विधानाबाबत खेद व्यक्त केला. सुप्रिया सुळेंबाबत तसा दावा करण्याचा आपला हेती नव्हता, सुप्रिया सुळेंच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला, अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली.