राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे तसेच अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, मात्र काही नेत्यांवर पक्षात अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाईल, असं त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठ्या घोषणा केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्यांसह पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुका सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात लढणार आहे. दरम्यान, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यावर सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे. ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. हे ही वाचा >> दिल्लीत शरद पवारांची मोठी घोषणा; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष! अजित पवारांवर सध्या कोणतीही नवी जबाबदारी नाही प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.