scorecardresearch

दाढी राखलेले शरद पवार कधी बघितलेत का? नसतील बघितले तर नक्की बघा…!

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शरद पवारांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

sharad pawar french cut look
शरद पवार (संग्रहीत छायाचित्र – पीटीआय)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महाराष्ट्र आणि दिल्लीतील राजकीय कारकिर्द वेगवेगळ्या असंख्य प्रकारच्या घडामोडींनी भरलेली आहे. राजकीय वर्तुळात शरद पवारांविषयी वेगवेगळ्या पक्षीयांच्या वेगवेगळ्या भूमिका राहिल्या आहेत. मात्र, शरद पवारांच्या राजकीय अनुभवाविषयी सर्वपक्षीयांमध्ये एकमत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे शरद पवारांच्या राजकीय भूमिकांची मोठी चर्चा जशी राज्यातल्या जनतेमध्ये दिसते, तशीच ती राजकीय वर्तुळातही दिसून येते. फक्त शरद पवारांच्या भूमिकांचीच नाही, तर त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. तशीच सध्या त्यांच्या एका फोटोची चर्चा सुरू झाली आहे.

सुप्रिया सुळेंची इन्स्टाग्राम पोस्ट!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या त्यांच्या वडिलांबद्दल अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या सोशल मीडियी अकाऊंट्सवरही त्या अॅक्टिव्ह असतात. सुप्रिया सुळेंनी बुधवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशाच प्रकारे शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातही चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.

sharad pawar french cut beard
शरद पवारांचा फ्रेंच कट लुक! (फोटो – सुप्रिया सुळे यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

काय आहे फोटोमध्ये?

सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा सोबत बसलेला एक फोटो पोस्ट केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो किमान ४० ते ५० वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोसह सुप्रिया सुळेंनी “नॉस्टॅल्जिया” अशी एका शब्दाची पोस्ट केली आहे. या फोटोत शरद पवारांची चक्क फ्रेंच कट दाढी असल्यामुळे तो विशेष चर्चेचा ठरला आहे. सध्याच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या पीढीत शरद पवारांना त्यांच्या तरुणपणी पाहिलेली फारच थोडी मंडळी असतील. बहुसंख्य लोकांनी शरद पवारांना त्यांच्या सध्याच्या लुकमध्येच पाहिलं आहे. त्याामुळे काळीभोर फ्रेंच कट दाढी राखलेल्या शरद पवारांचा हा फोटो दुर्मिळ श्रेणीतलाच ठरला आहे!

सुप्रिया सुळेंनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.”शरद पवारांना फ्रेंचकटमध्ये कधीच पाहिलेलं नाही. ते फारच वेगळे दिसत आहेत”, अशी पोस्ट एका युजरनं केली आहे. तर संदीपन मर्कड नावाच्या युजरनं “फ्रेंच कट, सुपर्ब. पहिल्यांदाच मी हे पाहिलं”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 12:18 IST

संबंधित बातम्या