Supriya Sule meets Uddhav Thackeray at Matoshree for Rajya Sabha election : राज्यात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीला एक जागा मिळू शकते. पण या एकाच जागेसाठीच महाविकास आघाडीत वाद सुरू झाले आहेत. या एका जागेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे नेमकी ही जागा कोणाला मिळणार याबाबत अद्यापही साशंकता आहे. दरम्यान, या मुद्द्यावर चर्चा करण्याकरता आज शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द आदित्य ठाकरे यांनीच माहिती दिली आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक असल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी (शरद पवार) १० आमदार, असे एकूण ४६ आमदार आहेत. विजयासाठी ३७ मतांची आवश्यकता असल्याने तिन्ही पक्षांची आघाडी कायम राहिल्यास एक जागा सहज निवडून येऊ शकते. पण राज्यसभेची जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. कारण २०२० मध्ये शिवसेनेने ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली होती, असा दावा त्यांनी केला आहे.
याबाबत आदित्य ठाकरे यांनी आज एक्स पोस्टमध्ये म्हटलंय, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आज उद्धव ठाकरे यांना मातोश्री येथे भेटले. या भेटीत राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते चर्चेकरता एकत्र येतील.”
जयंत पाटील काय म्हणाले?
“राज्यसभेच्या जागेसाठी ५ मार्चला अर्ज भरायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीत सर्वांनी एक उमेदवार करावा, याकरता उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली. पक्षाच्या वतीने आम्ही विनंती केली की शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जावेत असा पक्षातील कार्यकर्त्यांचा, लोकसभा आणि विधानसभेतील सदस्यांचा आग्रह आहे. त्यामुळे पवारांसाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आम्ही उद्धव ठाकरेंना केली आहे. याबाबत एक दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच, काँग्रेस पक्षाशी आमची चर्चा झाली आहे. आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही त्यांना कळवली आहे”, असं जयंत पाटील बैठकीनंतर म्हणाले.
