ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यावरून महाराष्ट्र सरकारवर भाजपानं टीकेची झोड उठवली आहे. मध्य प्रदेश सरकारला जे जमलं, ते महाराष्ट्र सरकारला का नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. यांदर्भात भाजपाकडून मोर्चे काढून निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाने मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना केलेल्या शेरेबाजीवर आता सुप्रिया सुळेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठून सुरू झाला वाद?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानावरून हा कलगीतुरा सुरू झाला. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे”, असं त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“तुम्ही राजकारणात कशासाठी आहात, घरी जा आणि स्वयंपाक करा”; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

“तो त्यांचा अधिकार, त्यात…”

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या विधानावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “आमचं सरकार दडपशाहीचं नाही. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावं, तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यात गैर काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, “त्यांना वाटलं, ते बोलले. मी त्याचा इतका काही विचार करत नाही आयुष्यात”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra pmw
First published on: 25-05-2022 at 17:00 IST