राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आणि भाजपा नेत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदारांबाबतही वेगवेळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे सातत्याने रंगणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आम्हाला आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलं आहे’, असं सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“आमचा ८ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आम्हाला रोज टीव्हीवर एका नवीन पक्षात पाठवलं जात आहे. आम्ही त्या ग्रुपवर गंमतीने बोलत असतो. आमच्या ग्रुपमध्ये मी एक जोक पाठवला. कारण आम्हाला ८ जणांना दररोज एका वेगळ्या पक्षात पाठवतात. कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपामध्ये, तर कधी शिवसेनेत. मी काल खासदार भास्कर भगरे सरांना म्हटलं की, आता फक्त मनसेमध्ये आपलं नाव लागलं नाही. अन्यथा बाकी सगळे पक्ष झालेत”, अशी मिश्कील टिपण्णी सुप्रिया सुळे यांनी केली.
‘आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात…’ : सुप्रिया सुळे
“आम्ही आपआपसात असं ठरवलं की आता भारतात नको, आता आपण इंटरनॅशनल स्तरावर जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ८ खासदार आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करूया, चला अमेरिका. असंच झालंय ना. आता जोक केले जात आहेत, काय दुर्देव आहे. काय चेष्टा मस्करी लावली. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेससोबत विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम
“आमची आणि काँग्रेसची पक्षाच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा कोणताही प्रस्ताव दोन्ही बाजूंकडून आलेला नाही. आम्ही केवळ महाविकास आघाडीतील मजबूत मित्रपक्ष म्हणून एकत्र आहोत,” असं स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं. सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “आमचे आणि काँग्रेसचे अतिशय कौटुंबिक आणि सलोख्याचे संबंध आहेत. परंतु, काँग्रेसकडून विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही तसा विचार केलेला नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि पुढेही एकत्रच लढू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
