Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये वेगळा निर्णय घेत शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर ५ जुलै २०२३ या दिवशी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी त्यांच्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली. शरद पवारांनी त्यांना कसं प्रत्येकवेळी पुढे करुन व्हिलन केलं हेदेखील सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्हही अजित पवारांना निवडणूक आयोगाने दिलं. अशात आता सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) त्यांच्या मनात असलेली खंत बोलून दाखवली आहे. राखी पौर्णिमेला एक दिवस उरलाय. अशात सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे.
सुप्रिया सुळे अमळनेरमध्ये काय म्हणाल्या?
“आज अनेक लोक टीका करतात कारण मी कोणत्याही कंत्राटातले पैसे खात नाही. मी कुणाचीही पाच पैशांची मिंधी नाही. राजकारणात मी पैसे कमवण्यासाठी नाही तर बदल घडवण्यासाठी आले आहे. महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे जे बदलायचं आहे. त्यांना (भाजपा) वाटतं की पैसे वाटले की लोक विकत घेता येता. पन्नास खोके एकदम ओके घोषणाही त्यामुळेच प्रचलित झाली आहे. ते माझ्यावर टीका करु शकतात, मात्र मी टीका केली तर मला भीती दाखवतात, असं असलं तरीही लक्षात ठेवा मी घाबरत नाही. सत्यमेव जयते! विजय सत्याचाचच होतो.” असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या.
हे पण वाचा- ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’, सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, “त्या दिवशी…”
सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून आल्या आहेत
भाजपावर त्यांनी आज विविध मुद्द्यांवर टीका केली. तसंच पत्रकार परिषदेतही त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि अजित पवार हे बहीण भाऊ आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवरांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून तर सुप्रिया सुळे महाविकास आघाडीकडून उभ्या राहिल्या होत्या. बारामतीची निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांनी सगळी ताकद पणाला लावली होती. मात्र शरद पवारांनाच बारामतीकरांनी कौल दिला त्यामुळे सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) निवडून आल्या. यानंतर काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चूक केली हे मान्य केलं. अशात आता सुप्रिया सुळेंनी राखी पौर्णिमेला एक दिवस उरलेला असताना त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे. अदृश्य शक्ती असा उल्लेख करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
आमचा पक्ष अदृश्य शक्तीने उद्ध्वस्त केला
सुप्रिया सुळेंनी राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधी त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवली. “वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करायचा असतो, त्यासाठी एक पाऊल मागे घेतलं. मी कधीही फार जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत. मी वडिलांच्या जागेवर काम करायचं असा निर्णय झाला होता त्यावेळीच आमच्या आयुष्यात एक वादळ आलं, एक अदृश्य शक्ती आली आणि त्या अदृश्य शक्तीला आमचं सुख बघवलं गेलं नाही. या अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त केलं. घर म्हणजे पवार कुटुंब नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तो उद्ध्वस्त करण्याचं पाप अदृश्य शक्तीने केलं. आमचा पक्ष उद्ध्वस्त झाला, त्यावेळी तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही रडला असतात की लढल्या असतात?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित भगिनींना विचारला. तसंच त्या पुढे म्हणाल्या, मला माझी कुठलीही भगिनी रडायला नाही तर लढायला शिकवते. त्यामुळेच मी लढते आहे.