शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधात असताना वेगळी भूमिका घेणाऱ्या भाजपची सत्तेवर आल्यानंतर दोन वर्षांतच भूमिका बदलली आहे. वर्षभरात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असून ही दुर्दैवी बाब आहे. या परिस्थितीतही भाजप सरकार कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

जिल्ह्यतील संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून शुक्रवारी सुळे यांनी स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. सरकारने मंत्र्यांच्या गाडय़ांवरील लाल दिवे काढण्याची घोषणा करण्याऐवजी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणे गरजेचे आहे.

नागपूर हे गुन्हेगारीचे शहर बनले आहे. शासकीय विश्रामगृहात अत्याचारासारखी घटना घडते. आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात असे घडले नव्हते. नागपूरच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नागपूर-मुंबई महामार्गास शेतकरी विरोध करत आहे. विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही. पण जनतेचा त्या प्रकल्पाला विरोध असल्यास सरकारने त्यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांशी बैठकीनंतर सुळे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन अनधिकृत गर्भपात प्रकरणाची माहिती घेतली.