“आमची आणि काँग्रेसची पक्षाच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा कोणताही प्रस्ताव दोन्ही बाजूंकडून आलेला नाही. आम्ही केवळ महाविकास आघाडीतील मजबूत मित्रपक्ष म्हणून एकत्र आहोत,” अशी ठाम स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध चर्चांवर भाष्य केले.

एकनाथ शिंदेंच्या दालनातील ‘त्या’ बैठकीवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

विधानभवनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली होती. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

या वादावर स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पवार साहेब विधानभवनात गेल्यानंतर पक्षाच्या आमदारांनी त्यांना मार्गदर्शनाची विनंती केली. तिथे जे केबिन सर्वात जवळ उपलब्ध होतं, तिथे ही बैठक झाली. ते केबिन योगायोगाने एकनाथ शिंदे यांचं निघालं, हा केवळ एक योगायोग होता. मी स्वतः संजय राऊत यांना फोन करून या संपूर्ण घटनाक्रमाची कल्पना दिली आहे. त्यामुळे यावर इतकी मोठी बातमी झाली, याचं मला आश्चर्य वाटतं. हा सगळा प्रकार केवळ गैरसमजातून झाला आहे.”

पृथ्वीराज चव्हाणांचा ‘तो’ दावा फेटाळला

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ आहेत’, असा खळबळजनक दावा केला होता. याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमचे आठही खासदार पूर्णपणे एकत्र आहेत आणि आम्ही एका कुटुंबासारखे काम करतो. आमच्यात कोणीही नाराज नाही. आमच्यातील कोणी त्यांना जाऊन भेटलं असेल, असं मला तरी वाटत नाही,” अशा शब्दांत सुळेंनी हा दावा फेटाळून लावला.

भाजपशी हातमिळवणी आणि ‘दोन्ही राष्ट्रवादी’ एकत्र येण्यावर मोठं वक्तव्य

“आम्ही भाजपसोबत जाणार का? अशा चर्चा गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहेत. आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही आणि आम्हीही कोणाशी चर्चा केलेली नाही,” असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

त्याचसोबत, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? यावर बोलताना त्या म्हणाल्या, “जेव्हा अजितदादा आपल्यासोबत होते, तेव्हा दोन्ही गट एकत्र राहण्याची त्यांची इच्छा होती. पुढे काय करायचं हे आमचं आणि दादांचं आधीच ठरलं होतं. पण आता या जुन्या मुद्द्यांवर बोलण्यात काहीही अर्थ नाही.”

काँग्रेससोबत विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम

काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष एकमेकांमध्ये विलीन होणार का? या सातत्याने रंगणाऱ्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी पूर्णविराम दिला.

“आमचे आणि काँग्रेसचे अतिशय कौटुंबिक आणि सलोख्याचे संबंध आहेत. परंतु, काँग्रेसकडून विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही तसा विचार केलेला नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि पुढेही एकत्रच लढू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.