Supriya Sule on Rohit Pawar Questions : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा करत त्यांनी अनेक पुरावे सादर केले आहेत. याप्रकरणी त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली आहे. दरम्यान, पवार कुटुंबीयांतील रोहित पवारच या घटनेप्रकरणी अग्रक्रमाने बोलताना दिसत आहेत. इतर सदस्यांकडून असा संशय अद्याप व्यक्त करण्यात आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या दिल्लीतून बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय. त्यांनी शब्द दिला आहे की याची सविस्तर चौकशी करतील. रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं सापडत नाहीयत. काय झालं, कसं झालं, आपण वाचवू शकलो असतो का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याने ही त्याची अस्वस्थता मांडली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सविस्तर चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्या चौकशीची आपण वाट पाहूयात.”

याप्रकरणी पवार कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत भूमिका घेतली जात नसल्यावरून आज विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमचं कुटुंब खूप अडचणीच्या काळातून जात आहोत. एकमेकांना आधार देत आम्ही पुढे जात आहोत.”

अजित पवारांबरोबर काय चर्चा झाली होती?

ठआज दादा नाही, त्यामुळे मला जुनं उणंधुणं काढायचं नाही. तो माझा दादा होता. पण तो आज आपल्यात नाही. माझ्यात आणि त्याच्यात जी काही चर्चा झाली ती आमच्यात आहे. आज तो जिथे असेल तिथे तो आनंदी असेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुनेत्रा पवारांसाठी आनंद, पण दादा गेल्याचं दुःख आहे

आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ऑनलाईन कॉन्फरसिंगद्वारे एकत्र आल्या होत्या. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी आणि वहिनी आधीही एकत्र राहिलो आहे. वहिनीवर ही खूप मोठी जबाबदारी आली आहे. एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू आहेत. एकीकडे वहिनी उपमुख्यमंत्री झाली हा आनंद आहे तर दुसरीकडे दादा नाहीय हे दुःख आहे. काही नाती अशी असतात की हे दु:ख मनात आयुष्यभर राहील. हे नातं आमचं सर्वच बहीण भावांमध्ये आहे. एवढ्या लहान वयात ज्या पद्धतीने गेला. दादा कधी थकला, आजारी पडला आहे असं कधीच झालं नाही. आमच्यासाठी खरंच वाटत नाही की दादा आमच्यात नाहीय”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा

दरम्यान, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. तसंच, या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी, राजनाथ सिंग, ओमर अब्दुलांसह अनेकांनी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करण्याकरता फोन केले होते. या सर्व काळात सर्वांनी पवार कुटुंबाा साथ दिली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.