scorecardresearch

बेळगावात महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक, सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या; म्हणाल्या, “राज्यकर्ते एवढे…”

सुप्रिया सुळे म्हणतात, “महाराष्ट्र सरकार सातत्याने केंद्र सरकारसमोर…”

बेळगावात महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक, सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या; म्हणाल्या, “राज्यकर्ते एवढे…”
सुप्रिया सुळे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चिघळत चालला आहे. कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत महाराष्ट्राच्या सहा ट्रकचे नुकसान झालं आहे. यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

“या घटनेनंतर महाराष्ट्र सरकार काय करत आहे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते एवढे दुर्बळ झाले असून, राज्यातील प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली पाहिजे. बेळगावमधून काही मराठी भाषिकांचे फोन आले आहेत. पोलीस यंत्रणा त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपाच्या विचारांचे सरकार आहे. यावर केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालायला हवं,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकला विनंती करत म्हणाले “हे उकसवायचं काम…”

“महाराष्ट्र सरकार सातत्याने केंद्र सरकारसमोर बोटचेपी भूमिका घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. प्रकल्प बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात त्यावर काही निर्णय होत नाही. महापरिनिर्वाण दिनी भारतात राज्या-राज्यात वाद होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐक्याची भूमिका मांडली, संविधान दिलं. अशा महत्वाच्या दिनी देशाला लाजिरवाणी गोष्टी घडली. भारतासाठी हा काळा दिवस आहे,” असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 15:10 IST

संबंधित बातम्या