Supriya Sule On Sunetra Pawar Deputy CM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. त्यांच्या अपघाती निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याच दिसून येत आहे. आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार आज सकाळीच मुंबईत दाखल झाल्या होत्या.

या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आणि सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत बोलताना सुप्रिया सुळेंनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. “मला यातलं काहीही माहिती नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी याबाबत अधिक बोलणं टाळलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“उद्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे मला दिल्लीला जावं लागत आहे. आता माझी फ्लाईट असून मी दिल्लीला चालले आहे. कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची सभागृह नेता असल्यामुळे मला दिल्लीला जावं लागत आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी हात जोडत एका वाक्यात उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, “मला यातलं काहीही माहिती नाही.”

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “मला एवढं माहिती आहे की आमच्या राष्ट्रवादी पक्षात आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात एकत्र काम करण्याची प्रतिक्रिया सुरू करावी यासाठी एकमत झालं होतं आणि आता १२ तारखेला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता. मात्र, दुर्देव आहे की हा अपघात झाला”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.