Supriya Sule on Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बारामतीमध्ये लँडिंग करत असताना विमानाचा अपघात झाल्यामुळे अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यानंतर राजकारणातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी खेद व्यक्त केला आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर Devastated असा एक इंग्रजी शब्द ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र काही वेळाने हे स्टेटस डिलीट करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती दौऱ्यावर येत होते. आज त्यांच्या चार प्रचार सभा पार पडणार होत्या.

अजित पवार हे व्हीएसआर कंपनीच्या खासगी विमानाने बारामती येथे होते. विमानातील एकूण पाच प्रवाशांची नावे समोर आली आहेत. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असल्याची माहिती समोर आली. मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेकऑफ घेतले होते. तर बारामतीमध्ये ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते.
Delhi: NCP(SP) MP Supriya Sule left her Delhi residence pic.twitter.com/rNq8ixrQZM
— IANS (@ians_india) January 28, 2026
रोहित पवारांना अश्रू अनावर
अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर बारामतीमधील कार्यकर्ते आणि सामान्य लोक बारामती मेडिकल कॉलेजच्या परिसरात जमू लागले. याच कॉलेजच्या रुग्णालयात विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. यावेळी रुग्णालयाबाहेर आमदार रोहित पवार येताना दिसले. कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले. यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठा आक्रोश करण्यात येत आहे.
सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीसाठी रवाना
खासदार सुप्रिया सुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत होत्या. अपघाताची बातमी मिळताच त्या बारामतीकडे रवाना झाल्या आहेत.
विमानातील लोकांची नावे आली समोर
सदर विमान हे व्हीएसआर कंपनीचे खासगी विमान होते. यात एकूण पाच प्रवाशांचे नाव समोर आले आहे. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असल्याची माहिती समोर आली. मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेकऑफ घेतले होते. तर बारामतीमध्ये ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते.
