महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रोज नवनवीन घडामोडी घडत असतानाच, देशाच्या राजधानीतून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ८ खासदारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत राजकीय भाष्य टाळून महाराष्ट्रातील प्रलंबित विकासकामे, शेतकरी प्रश्न आणि मतदारसंघातील कळीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या ऊर्जेचे कौतुक
बैठकीच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची अत्यंत आस्थेने विचारणा केली. या वेळी बोलताना पंतप्रधानांनी शरद पवारांच्या कार्यशैलीचा आणि राजकीय जीवनप्रवासाचा गौरव केला. “शरद पवार यांच्यातील कामाची ऊर्जा आणि उत्साह हा राजकारणातील प्रत्येकासाठी एक उत्तम आदर्श आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी पवारांच्या कामाचे कौतुक केले.
‘भारतरत्न’ पुरस्कारासह महाराष्ट्रातील प्रमुख मागण्यांवर भर
या बैठकीदरम्यान राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदारांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्या पंतप्रधानांसमोर मांडल्या:
- महान व्यक्तिमत्त्वांना ‘भारतरत्न’: संतांची अन् विचारवंतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी खासदारांनी केली.
- पाणीप्रश्न आणि पीएम केअर्स निधी: बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत उजनी धरणाचे पाणी मांजरा धरणात सोडून बीडला दिलासा देण्याची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. याशिवाय ‘पीएम केअर्स’ निधीतून गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या मदतीचा कोटा सर्व खासदारांसाठी वाढवावा, असा मुद्दा मांडण्यात आला.
- नवी मुंबई विमानतळ नामकरण: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असून, यावर केंद्राने तत्काळ अंतिम निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
- रेल्वे अन् पायाभूत सुविधा प्रकल्प: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प, पुणे-नाशिक मेट्रो, छत्रपती संभाजीनगर येथील ‘पीएम गतिशक्ती’ योजना, जेएनपीटी बंदर आणि कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्याबाबत पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आले.
- आरोग्य आणि इतर मुद्दे: खासदार निलेश लंके यांनी वाढत्या कर्करोग उपचारांच्या सुविधांवर चर्चा केली, तर चंद्रभागा नदीचे प्रदूषण, कांद्याचे भाव यांसारख्या मुद्द्यांवरही खासदारांनी विचार मांडले.
“संसदेचे कामकाज ठप्प असल्याने थेट संवाद” – सुप्रिया सुळे
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, या भेटीदरम्यान कोणताही राजकीय विषय चर्चेत आला नाही. “संसदेचे कामकाज सुरळीत चालत नसल्याने जनतेचे आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न थेट पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही पक्षातील मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी हा सकारात्मक संवाद झाल्याचे नमूद केले.
