Supriya Sule on Parth Pawar Pune Land Scam : पुण्यातील सुमारे १८०० कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आले आहे. त्याचवेळी या व्यवहारासाठी मदत करणार्या दोन सरकारी अधिकार्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. याप्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे सूत्रांच्या अहवालांवर मी बोलणार नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून असे अहवाल प्रत्यक्षात वाचल्याशिवाय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असे अहवाल गोपनीय असतात, त्यामुळे ते बाहेर येत नाहीत आणि जर अहवाल प्रसिद्ध झाले तर ते वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देत नाही.”
“आत्या मी चुकीचं काही केलं नाही”
दरम्यान, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण बाहेर आलं होतं, तेव्हा सुप्रिया सुळेंनी त्यांची पाठराखण केली होती. आताही त्यांची हीच भूमिका आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, “जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचं नाव आल्याचं वृत्त मी टीव्ही चॅनलवर पाहिलं. त्यानंतर मी स्वतःहून त्याला सकाळी फोन केला. या प्रकरणी त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला होता की आत्या मी चुकीचं काही केलं नाहीय, यावर मी तुम्हाला सविस्तर सांगेन. त्याच्या या विधानावर मी विश्वास ठेवला.”
त्या पुढे म्हणाल्या, ” आत्या, मावशी, आई म्हणून आमच्या घरातील मुलांनी कोणतंही चुकीचं काम करू नये, अशी माझी सर्वांकडून अपेक्षा आहे. असेच संस्कार आमच्या घरातून दिले जातात. “
दरम्यान, “हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. या देशात कोर्टाचे निर्णय मान्य करायचे असतात. त्याचे काही नियम असतात. त्यामुळे मला वाटतं की तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर येईपर्यंत कोणत्याही न्यायालयीन प्रकरणावर बोलणं मला योग्य वाटत नाही” असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार अपघातप्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालयाने उत्तरे द्यावीत
“नागरी उड्डाण मंत्रालयाने अजित पवार विमान अपघात प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन पारदर्शकपणे उत्तरे द्यावीत. अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्यावीत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

