पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाच – “राज ठाकरेंनी दौरे काढले तर…”; अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तसेच पीएफआयवरील बंदी संदर्भात संसदेतदेखील केंद्र सरकारला स्पष्टीकरण विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधीपक्षांवर होणाऱ्या कारवाईवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांत ९० छापे हे विरोधीपक्षाच्या नेत्यांवर झाले आहेत. भाजपा लॉंड्रीत आल्यानंतर अनेकांची सुटका होते, असे भाजपाचेच नेते म्हणतात. मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. जे घडतय ते अत्यंत दुर्दैवी आहे”, असे ही त्या म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ –
दरम्यान, महागाई आणि सिलिंडरच्या वाटपावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहे. “एकतर नवरात्र, दिवाळी आहे. त्यात केंद्र सरकारने एका महिन्याला केवळ २ सिलेंडर देण्याचा निर्णय केला आहे. सिलिंडरची कमतरता आहे का? याचं उत्तर आधी केंद्र सरकारने द्यायला हवं. हा निर्णयही दुर्दैवी आहे”, असे त्या म्हणाल्या.