Supriya Sule on Both NCP Party Meetings in Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. हे दोन्ही गट आज त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. पुण्यातील बालेवाडीमधील मोठ्या मैदानात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन होणार अशी चर्चा चालू आहेत. अशातच संपूर्ण राज्याचं दोन्ही पक्षांच्या मेळाव्यांकडे लक्ष लागलं आहे.
एका बाजूला पक्ष विलीनीकरणाची चर्चा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसची बरीच चर्चा होऊ लागली आहे. “आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही”, असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतानाच सुप्रिया सुळे यांनी स्वतःच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘त्या’ व्हॉट्सअॅप स्टेटसबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
पक्षाच्या मेळाव्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर परिसरात दाखल झालेल्या सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी त्या स्टेटसमध्ये केवळ माझ्या आईचा संदर्भ दिला आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत लेखकाला लिहायचा अधिकार आहे”.
दरम्यान, खासदार सुळे यांना विचारण्यात आलं की शरद पवार यांनी हा पक्ष उभा केला होता, आता त्याचे दोन गट तयार झाले असून आज त्या दोन्ही गटांचे मेळावे पार पडत आहेत, या सगळ्यावरील तुमची ही प्रतिक्रिया आहे का? यावर सुप्रिया सुळे म्हणाले, “ती गोष्ट मी तुम्हा प्रसारमाध्यमांच्या कल्पनेवर सोडून दिली आहे”.
पक्ष विलीनीकरणाच्या चर्चेवर काय म्हणाल्या?
काही महिन्यांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की पक्षाबाबतचे निर्णय आता सुप्रिया सुळे घेतील. सध्या राजकीय वर्तुळात ज्या चर्चा चालू आहेत त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी काही निर्णय घेतले आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर खासदार म्हणाल्या, “त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत”. यावेळी त्यांना पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मी आत्ताच भारतात आले आहे. १४ दिवस परदेशात होते. त्यानंतर दोन दिवस दिल्लीत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही”.