शरद पवार यांनी प्रतिभा पवार यांच्याशी १९६७ साली लग्न केलं होतं, पण लग्नापूर्वी शरद पवारांनी एक अट ठेवली होती, असा खुलासा त्यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी अभिनेत्री सोहा अली खानला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांचं बालपण, आई-वडिलांचे विचार, लग्न, राजकारण अशा बऱ्याच विषयांवर भाष्य केलं.
शरद पवारांनी लग्नाआधी कोणती अट ठेवली होती?
“माझ्या वडिलांनी लग्न करण्यापूर्वी एक अट ठेवली होती. ‘फक्त एकच मूल होऊ द्यायचं, मग तो मुलगा असो वा मुलगी’. माझ्या आईने फार विचार केला नाही आणि तिने अट मान्य केली. माझ्या वडिलांना तर मूल दत्तक घ्यायचं होतं. ‘कुटुंबातलंच एखादं मूल दत्तक घेऊ’ असं ते म्हणाले होते. माझ्या आईने नकार दिला. ‘स्वतःचं एक मूल होऊ द्यायचं,’ असं तिचं म्हणणं होतं. माझ्या वडिलांनी होकार दिला. माझ्या जन्मानंतर माझ्या आईने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली नव्हती, तर माझ्या वडिलांनी केली होती. त्यांनी माझ्या आईला ती वेदना सहन करू दिली नाही. अशा काही गोष्टी असतात ज्या आयुष्यभर तुमच्याबरोबर राहतात,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सुप्रिया सुळेंनी जेव्हा शरद पवारांना सांगितलं
“माझे वडील काम करत होते, मी त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, ‘माझ्याकडे तुमच्यासाठी एक बातमी आहे.’ मी सांगितलं की मी दुसऱ्यांदा गरोदर आहे. सामान्यतः असं ऐकून आजोबा आनंदी होतात, ते म्हणाले ‘ओह’. मी विचारलं की ही काय प्रतिक्रिया आहे. ‘तुम्हाला आनंद झाला नाही का?’ ते म्हणाले, ‘तुला एक मूल आहे, मग दुसरं कशाला हवंय?’ मग मी त्यांना म्हटलं की मला दुसरं बाळ हवंय. त्यावर ते म्हणाले, ‘ठीक आहे. तो तुझा आणि तुझ्या पतीचा निर्णय आहे.’ असं बोलून ते पुन्हा त्यांचं काम करू लागले,” असा किस्सा सुप्रिया सुळेंनी सांगितला.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आपण पुरोगमी (लिबरल) असं म्हणतो, पण तो शब्द फक्त बोलण्यापुरता नाही. माझे आई-वडील खूप पारंपरिक आहेत. त्यांची विचार करण्याची पद्धत भारतीय असली तरी ते १०० पटीने जास्त मोकळ्या आणि आधुनिक विचारांचे आहेत.”
आपण आधीच्या पिढ्यांइतके सहनशील नाही- सुप्रिया सुळे
७० च्या दशकातील चित्रपटांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “७० च्या दशकात श्यामजींनी बनवलेले काही चित्रपट आहेत, आता जेव्हा मी ते चित्रपट बघते तेव्हा मला वाटतं की ते त्या काळी सामाजिक समस्यांवर बोलत होते. त्यांनी ज्या पद्धतीने त्या काळी सामाजिक समस्या मोठ्या पडद्यावर मांडल्या, त्या पद्धतीने आज कोणी प्रयत्न केला तर कदाचित थिएटर्स जाळले जातील. पण त्या काळच्या लोकांनी त्या चित्रपटांविषयी मतं बनवली नाहीत, कारण समाजात ही आव्हानं आहेत हे स्वीकारायची त्यांची मानसिकता होती. लिंगभेद आहेत आणि आपण ते मान्य करायलाच हवे आणि त्यांना जमेल तसा पाठिंबा द्यायला पाहिजे, अशा विचारांचे ते लोक होते. आता कधीकधी मला विचार येतो की आपण आपल्या आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत खूप कमी सहनशील आहोत. ते आपल्यापेक्षा खूप मोकळ्या विचारांचे आहेत, असं मला वाटतं.”
