Supriya Sule Sharad Pawar Reaction: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच अभिनेत्री सोहा अली खानला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत खास किस्सा शेअर केला आहे. सुप्रिया सुळे जेव्हा दुसऱ्यांदा गरोदर होत्या, तेव्हा ही आनंदवार्ता ऐकून वडील शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा खुलासा त्यांनी केला. गरोदरपणाची बातमी ऐकून आजोबा होणार म्हणून आनंदी होण्याऐवजी शरद पवार म्हणाले होते, “दुसरं कशाला हवंय?” वडिलांच्या या वेगळ्या आणि थेट प्रतिक्रियेने सुप्रिया सुळे आश्चर्यचकित झाल्या होत्या.

खासदार सुप्रिया सुळे गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. त्या आपल्या राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच कौटुंबीक जबाबदाऱ्याही पार पाडतात. सुप्रिया सुळे यांचं १९९१ साली सदानंद सुळे यांच्याशी लग्न झालं. सदानंद सुळे हे उद्योजक आहेत. त्यांनी आपले उच्च शिक्षण परदेशातून पूर्ण केले आहे. राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली असतानाही, सदानंद सुळे यांनी स्वतःला नेहमीच राजकारणापासून लांब ठेवलं. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीत आणि सामाजिक कार्यात त्यांच्या पतीचा मोठा पाठिंबा आणि मोलाची साथ राहिली आहे.

सुप्रिया आणि सदानंद सुळे यांना मुलगी रेवती व मुलगा विजय, अशी दोन अपत्ये आहेत. सुप्रिया सुळे जेव्हा दुसऱ्यांदा गरोदर होत्या, तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती, ते पाहुयात.

कशाला हवंय दुसरं बाळ? शरद पवार सुप्रिया सुळेंना काय म्हणाले होते?

“माझे वडील काम करत होते, मी त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, ‘माझ्याकडे तुमच्यासाठी एक बातमी आहे.’ मी सांगितलं की मी दुसऱ्यांदा गरोदर आहे. सामान्यतः असं ऐकून आजोबा आनंदी होतात, ते म्हणाले ‘ओह’. मी विचारलं की ही काय प्रतिक्रिया आहे. ‘तुम्हाला आनंद झाला नाही का?’ ते म्हणाले, ‘तुला एक मूल आहे, मग दुसरं कशाला हवंय?’ मग मी त्यांना म्हटलं की मला दुसरं बाळ हवंय. त्यावर ते म्हणाले, ‘ठीक आहे. तो तुझा आणि तुझ्या पतीचा निर्णय आहे.’ असं बोलून ते पुन्हा त्यांचं काम करू लागले,” असा किस्सा सुप्रिया सुळेंनी सांगितला.

दरम्यान सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलं रेवती व विजय उच्चशिक्षित असून त्यांनीही सध्या तरी सक्रिय राजकारणापासून स्वतःला लांब ठेवलंय. त्यांची मुलगी रेवती सुळे हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तिचे शिक्षण पूर्ण केलंय. रेवतीचं लग्न नुकतंच सारंग लखानी यांच्याशी झालं.