‘दुष्काळ हाताळण्यामध्ये सरकार-प्रशासन अपयशी’

खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

सुप्रिया सुळे यांची टीका

जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यात सरकार व प्रशासन अयशस्वी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भोकरदन येथे काढलेल्या मोर्चात करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी अनुदानातून कापूस पीक वगळल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. बागायती पिकांना, तसेच फळबागांना आर्थिक मदतही सरकारने दिली नाही. मागणीप्रमाणे रोजगार हमीची कामे सुरू केली जात नाहीत. सुरू असलेल्या कामांवर मजुरांना निर्धारित वेळेत मजुरी देण्यात येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहीत केलेले स्रोत आटल्यामुळे टँकर उभे राहात आहेत. ज्या काही ठिकाणी थोडे-फार पाणी शिल्लक आहे, येथील वीजपुरवठा सुरळीत नसल्याने टँकर भरण्यात व्यत्यय येत आहे. अशा स्थितीत पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.

जलयुक्त शिवारखाली ५५ कोटींची तरतूद करूनही एक वर्षांत संबंधित कामे पूर्ण झाली नाहीत. मागेल त्याला शेततळे योजनेतील ५० हजार रुपयांचे अनुदान अपुरे असून त्यातून काम पूर्ण होत नाही. युती सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात १४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्या तरी शासकीय मदतीसाठी मात्र त्या सर्व पात्र ठरविल्या नाहीत.

पीककर्जाच्या पुनर्गठणाची घोषणा झाली, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. अजूनही रब्बी पीकविमा देण्यात आला नाही. जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणेत ५० टक्के जागा रिक्त असल्याने दुष्काळी स्थिती हाताळण्यात अपयश येत आहे आदी बाबींकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. शेतक ऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, तसेच मोफत बियाणे व खतांचा पुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर खासदार सुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना शेतकरी कर्जमाफीविषयी काही देणे-घेणे नसल्याचे सांगून या संदर्भात ते शेतकऱ्यांना अवमान करीत असल्याचा आरोप केला. सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमदार टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचीही भाषणे झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्य़ातील अन्य सहा तालुक्यांच्या ठिकाणी, तसेच जालना येथेही दुष्काळ प्रश्नावर राष्ट्रवादीच्या वतीने मोर्चे काढण्यात येऊन धरणे धरण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Supriya sule slam on government on drought issue

ताज्या बातम्या