माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा एफआयआर दाखल न झाल्याच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. इतर प्रकरणांमध्ये तातडीने गुन्हे दाखल केले जातात. मात्र, अजित पवारांच्या अपघाताला इतके महिने होऊनही गुन्हा दाखल झालेला नाही, असं म्हणत सुळेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्युत्तर देत “अजित पवारांच्या अपघाताचं राजकारण करू नये”, असं म्हटलं होतं.
सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एक मोठं वक्तव्य करत आता आपण या मुद्द्यावर अधिक भाष्य करणार नसल्याचं सांगितलं आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत यापुढे आपण बोलणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी आज (६ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया देत अशा गोष्टी करुन मीडिया ट्रायल होते की काय असं वाटतं, असं म्हटलं होतं. सुनेत्रा पवारांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी आज सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माझी हात जोडून विनंती आहे, त्यांच्यावर आम्ही कोणीही बोलणं, मी देखील आजपासून या विषयावर बोलणं बंद केलं आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या होत्या?
“खरं सांगायचं तर आदरणीय अजित पवार गेल्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमच्यावर आकाश कोसळलं, ते माझ्या आणि माझ्या मुलांपेक्षा जास्त कोणाला माहिती असणार? या घटनेच्या संदर्भात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी आम्ही घेतल्या आहेत. तपास यंत्रणा देखील त्यांचं काम करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की आपण तपास यंत्रणांना वेळ दिला पाहिजे. फक्त सतत मीडियात येणं म्हणजेच अपडेट मिळणं असं नाही. मला वाटतं की वारंवार अशा गोष्टी करुन मीडिया ट्रायल होते की काय असं वाटतं. खरंतर सर्वांनी विचार केला पाहिजे”, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं होतं.
सुप्रिया सुळेंनी आधी काय वक्तव्य केलं होतं?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला म्हणून अमित ठाकरे यांच्यावर तुम्ही एफआयआर दाखल करता. मात्र, माझ्या भावाचा विमान अपघात झाला, माझा भाऊ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होता, पण तरीही आजपर्यंत या सरकारने एफआयआर दाखल केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारचा भाग आहे की नाही? त्यांचे ४० आमदार आहेत की नाही? त्या ४० आमदारांनी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक शब्द तरी काढला का?”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
