खासदार सुप्रिया सुळे यांनी २०४७ चा महाराष्ट्र कसा असेल? राज्यातील शिक्षणाची परिस्थिती, पायाभूत सोयी-सुविधा. तसंच अजित पवार यांचं अपघाती निधन, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण या सगळ्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तरं दिली आहेत. राष्ट्रवादीचा पुढचा मार्ग हा स्वतंत्र मार्ग असेल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे, तसंच भाजपा हा आमचा राजकीय विरोधक आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे २०४७ च्या महाराष्ट्राबाबत काय म्हणाल्या?

२०४७ मध्ये कुणाचंही सरकार असेल तर चांगलं होईलच. पण मला वाटतं आपण आज तर चांगलं जगुयात. २०२६ मध्ये मुंबईत ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. रस्त्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही. मोठे जे रस्ते आहेत, हायवे आहेत ते छान वाटतात. मोठे नेते व्हिडीओ, फोटो ट्वीट करतात ते डोळ्यांना आनंद आणि समाधान देतात. पण रोज जो व्यक्ती वाहतूक कोंडीतून वाट काढत येतो त्याचं काय? विमान तळावर येताना माझ्यासारखी व्यक्ती सकाळी ६ ची फ्लाईट घेते किंवा रात्री ११ ची फ्लाईट घेते. कारण आम्ही दिवसा येण्याची हिंमतच करत नाही. मेट्रोने आलो तरी सव्वा तास लागतो आणि कारने आले तर दीड तास, दोन तास कितीही वेळ लागतो. मागच्याच आठवड्यातलं उदाहरण देते. मी सुशीलकुमार शिंदेंना माझ्या लेकीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेले होते, पाली हिलमधली एक गल्ली नाहीये जी खोदलेली नाही. पावसाळ्याच्या आधी त्यातलं कुठलंही काम होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे मुंबईतली माणसं २०४७ मध्ये एकमेकांना भेटतील का मेट्रो बांधा किंवा हायवे बांधा हा प्रश्न आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

आता आपण इतिहासावरुन, भाषेवरुन भांडतो आहोत-सुप्रिया सुळे

शिक्षणाची काय परिस्थिती आहे जरा बघा, आता आम्ही इतिहासावरुन, भाषेवरुन भांडतो. ‘असर’च्या सर्व्हेची वीस वर्षांपूर्वी चर्चा व्हायची. आता असरचा रिपोर्ट बाजूलाच राहिला आहे. सशक्त लोकशाहीत वाद झाला पाहिजे, पण तो किती ताणायचा? खरंच त्याचा थेट उपयोग होतो का? असरच्या रिपोर्टची चर्चा दरवर्षी संसदेत व्हायची. त्यात आमच्यावरही टीका व्हायची. किती लोकांना तो आज माहीत आहे? किती राजकारण्यांनाही माहीत आहे? असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. माझा व्हिजन या एबीपी माझाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. त्यामध्ये त्यांनी ही टीका केली आहे.

Supriya Sule
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या

मी २२ मिनिटं टॅक्सीसाठी मुंबईत वाट बघितली

टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य आहे ही राज्य सरकारची भूमिका मान्य आहे. पण सामान्य माणसांना वेळेवर टॅक्सी मिळणं, त्यांच्याशी उर्मटपणा न होणं, भाडे नाकारलं जाणं याचीही गरज आहे. मी प्रभादेवीला गेले होते, मी २२ मिनिटं एका टॅक्सीसाठी थांबले होते, पण त्या टॅक्सी चालकाला महालक्ष्मीला यायचं नव्हतं. मी मुंबईची मुलगी आहे, मला कुठेही सोडलं तरीही टॅक्सी, ट्रेन, मेट्रोने घरी जाऊ शकते. माझा ड्रायव्हर सुट्टीवर होता. मला प्रभादेवीहून घरी जाण्यासाठी टॅक्सी हवी होती. मला २२ मिनिटं वाट बघावी लागली. योगायोगाने एक मुलगी माझ्या बरोबर थांबली, तिला जास्त गरज होती. एखाद्या व्यक्तीला एखादी टॅक्सी जर इतका त्रास होत असेल तर मराठी आलीच पाहिजे या वादात मंत्र्यांनी पडावं. पण टॅक्सीवाला रोज सगळ्यांसाठी हजर असला पाहिजे आणि त्याने उर्मटपणा न करता त्याने भाडे नाकारता कामा नये. त्याचा लोकांना जास्त आनंद होईल असं मला वाटतं. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, उत्तम संवाद आहे

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, आमच्याकडे मोकळं वातावरण आहे, दडपशाही नाही. आमच्याकडे कुणी काही ठरवलं तर फोन येत नाहीत. शिवाय असं कुणी काही म्हणत नाही की फोन आला नको आता जाऊदेत. तिन्ही पक्ष मनमोकळेपणाने बोलत असतात. महाविकास आघाडी फुटली अशी चर्चा सुरु झाली आहे कारण उद्धव ठाकरे विधान परिषद लढवत नाहीये तर मग काँग्रेस वेगळा उमेदवार द्यायला तयार आहे असा प्रश्न विचारला गेला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, या गोष्टी होत असतात. सशक्त लोकशाही आणि आघाड्यांमध्ये असे विषय होत असतात. ममतादीदी आणि आम्ही इंडिया आघाडीत एकत्र आहोत. काँग्रेस आणि ते विरोधात लढले. पुणे महापालिकेत अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्याबरोबर लढला भाजपाच्या विरोधात. त्यामुळे या गोष्टी घडत असतात असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचा उत्तम संवाद आहे. आजच नाही रोजच असतो. संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यातली केमिस्ट्री विश्वासाची आहे. ठाकरे कुटुंब आणि गांधी कुटुंब यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे मला फारशी काही काळजी वाटत नाही असंही उत्तर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांचं निधन हा आमच्यासाठी धक्काच-सुप्रिया सुळे

कुठल्याही कुटुंबातला कर्ता पुरुष किंवा व्यक्ती जेव्हा अचानक जाते तेव्हा ज्या भावना प्रत्येक घरात असतात तशाच आमच्याही घरात आहेत. एक फरक जो जाणवतो तो तुम्हीही करत असाल की आम्ही बाहेर जाऊन दाखवत नाही. पण माझ्या वडिलांची (शरद पवार) खासियत अशी आहे की ते घरात आणि बाहेर सारखेच वागतात. ते कधीही आपल्या भावना कुणाला उलगडून दाखवत नाहीत. त्यामुळे शरद पवारांच्या मनात काय चाललेलं असतं त्याची कल्पना फारशी कुणाला नसते, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Supriya Sule Statement Over Ajit Pawar
अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर पार्थने मला फोन केला होता, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? (फोटो-सोशल मीडिया)

मला पार्थचा फोन आला होता आणि..

अजितदादाच्या निधनाची बातमी आली आणि आम्ही धक्क्यातच होतो अजूनही विश्वासच बसत नाही की तो नाहीये. मी दादाचे पाय बघितले आहेत फक्त, तो दादाच होता का अशी एक भाबडी भावनाही माझ्या मनात येते. पार्थने मला फोन केला होता की डॅडीचं विमान पडलं आहे मी त्याला म्हटलं होतं कशावरुन डॅडी त्या विमानात आहे? काहीतरी बोलू नकोस असं मी त्याला म्हटलं होतं. पण त्या गोष्टीला ९० दिवस झाले आहेत. रोहित पवारांना झगडावं लागतं आहे याचं कारण देवेंद्र फडणवीस माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात, आम्ही त्यांच्यावर अविश्वास का दाखवायचा?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय नो स्टेटस..

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय नो स्टेटस. कारण विलिनीकरणाचा विषय हा दादाच्या मनातील इच्छा होती. दादाच आता राहिला नाही तर विलिनीकरणाचा विषय राहिला कुठे? माझ्या मनात तरी या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. कारण विलिनीकरण व्हावं ही अजितदादाची इच्छा होती. मी त्याला नेता मानून मी अनेक वर्षे काम केलं आहे. आता दादा गेल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. गोड संवाद संपला आहे असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.