Supriya Sule on Walmik Karad : बीडमधील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढवत आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक अपडेट समोर आली आहे. आरोपी वाल्मिक कराडची बीड कारागृहामधून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर केली आहे. तसेच पोस्टमध्ये धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भही दिला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे. यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडीओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र.९ जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत.”

“न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी, बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं, यासाठी आमचं प्राधान्य असून यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.