राज्य सरकार अस्थिर असल्यामुळे सर्वच पक्षातील लोकांचा कानोसा घेतल्यास त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत, खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात केव्हाही मध्यवधी निवडणुका लागण्याचे सूतोवाच केले आहे.कराडमध्ये त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

इंडियन एक्सप्रेस व लोकसत्ता या वृत्तपत्रात ‘ईडी’च्या ९५ टक्के कारवाया या विरोधकांवरील असल्याच्या बातमीचा दाखला देवून खासदार सुळे म्हणाल्या, की “आज लहान मुलेही ‘ईडी’बाबत गमतीने बोलतात. ५० खोक्यांचीही सर्वत्र चर्चा होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. यामुळे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचे नाव कमी होत असून, फार मोठी कुचेष्टा होत आहे. त्यामुळे आम्हाला अस्वस्थ वाटते, वेदना होतात.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

हेही वाचा : ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात – सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा!

तर “माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या महाराष्ट्रातील राजकारण अशोभनीय बनले आहे. कुणी बंदूक काढतोय, कुणी एक थप्पड मारलीतर चार थप्पड मारा म्हणतोय, कुणी तुम्हालाही ५० खोकी पाहिजे का म्हणतोय.. ही विधाने ही आपल्या पुरोगामी विचारांच्या राज्याला शोभणारी नाहीत.” खंतही यावेळी खासदार सुळे यांनी व्यक्त केली.

राजकारण ज्या दिशेने आणि पद्धतीने चालू आहे ते निश्चित दुर्दैवी –

याचबरोबर महाराष्ट्राचे राजकारण ज्या दिशेने आणि पद्धतीने चालू आहे ते निश्चित दुर्दैवी असून, या साऱ्यावर आपला विश्वासच बसत नसल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ – ७ जिल्ह्यांचे पालकमंत्री पद असल्याबाबत विचारले असता, एका पालकमंत्र्याला कामाचा खूपच ताण असतो असे मत व्यक्त करून त्यांनी फडणवीसांकडे अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असणे चुकीचे असल्याचे नमूद केले. तसेच, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत लोकांमध्ये एकच चर्चा आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि महिन्याभरातच पक्षाचे चिन्ह सर्वत्र पोहोचले आणि आपला पक्ष सत्तेतही आल्याचे त्या म्हणाल्या. स्थानिक निवडणुकांत केवळ दहा दिवसांत उमेदवारांचे चिन्ह घराघरात पोहोचवले जाते. हेही सुळे यांनी निदर्शनास आणले.

पांडुरंगाचीच इच्छा एवढेच म्हणायचे राहिले –

राज्य सरकार किती दिवस टिकेल या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “पांडुरंगाचीच इच्छा एवढेच म्हणायचे राहिले आहे. आजकाल ज्या पद्धतीने कारभार होतोय, अनेक गोष्टी घडतायेत. ते चुकीचे आहे. शासनाला विकासाबाबत चर्चा करता येते की नाही? हा प्रश्न पडला आहे.” टीका खासदार सुळे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून ब्रॉडकास्टद्वारे साहित्य उपलब्ध करणार –

यशवंतराव चव्हाण यांचे विचार व साहित्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याकामी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळास भेट दिली. त्यांच्या संग्रहित ठेवलेल्या पत्रांचीही पाहणी केली. त्यांच्या पत्रांसह त्यांचे अनेक साहित्य व त्यातील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून ब्रॉडकास्टद्वारे नवीन पिढीसाठी साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये ऑडिओ व व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे वाचन केले जाईल. यशवंतराव चव्हाण यांचेवर ज्यांनी-ज्यांनी लेखन केले आहे. त्यांनी दरवर्षी एकदातरी कराडला चव्हाण यांच्या घरी भेट द्यावी. यामाध्यमातून कराडमध्ये दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावर व त्यांच्या विचारावर ॲकॅडमीक चर्चा केली जाईल. यामध्ये काही निवडक साहित्यिकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सुळे यांनी या वेळी सांगितले.