पालघर : महाराष्ट्राच्या इतिहासात सुरतेला विशेष स्थान आहे तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वर्तमानातील सत्ताकारणातही सुरत केंद्रस्थानी आले. सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हंगामातही या शहराला महत्व आले आहे. महिला मतदारांमध्ये वाट्ण्यासाठी सध्या जवळपास एक लाख साड्या दररोज सुरतेहून महाराष्ट्रात आणल्या जात आहेत.
निवडणूक आयोगाने कितीही दावे केले तरीही निवडणुकीदरम्यान मतदाराला आमिषे दाखवण्याची प्रथा रोखणे जमलेले नाही. पुरुष मतदारांना “मद्य, मांसाहार “ तर महिला मतदारांना “साडी-सामग्री” हा मतदार आपलेसे करण्याचा सोपा मार्ग मानला जातो. महाराष्ट्रातही हेच चित्र दिसून येते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यात अनेक भागांत “लाडक्या बहिणींना” साडीवाटप करण्यात आले. त्यासाठी सुरतेतून मोठ्या प्रमाणात स्वस्त साड्यांची खरेदी झाली होती.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने स्वस्त साड्यांची खरेदी आणि वाटप पुन्हा तेजीत सुरू आहे. निवडणुकीतील उमेदवार, आगामी निवडणुकांतील इच्छुक मंडळी मध्यसस्थ (एजंट) अथवा स्थानिक दुकानदारांच्या माध्यमातून सुरत येथून तीन-चार हजार साड्यांपासून एक लाख साड्यांपर्यंतची खरेदी करत असल्याचे समजते. बहुतांश ठिकाणी पाच टक्के वस्तु सेवा कर (जीएसटी) सह पक्के बिलाद्वारे खरेदी करणे अनिवार्य आहे. ही बिले निवडणूक खर्चात दाखवावी लागू नये म्हणून खरेदीदार वेगवेगळ्या पॅनकार्डचा वापर करून रोख्याने खरेदी करत असल्याचेही दिसून आले. हजारो दुकानांच्या माध्यमातून दररोज लाखो स्वस्त साड्यांची विक्री होत असेल.
सोळाव्या शतकापासून प्रसिद्ध
सोळाव्या शतकापासून रेशीम व कापसापासूनच्या सुती कापडासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुरत शहरामध्ये १९७० च्या दशकात आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले व पॉलिस्टर अर्थात सिंथेटीक साड्यांचे ते जागतिक केंद्र स्थान बनले. सध्या सुरत व परिसराच्या ६० किलोमीटर परिघात किमान ५० लाख विणकाम करणारे वेगवेगळ्या प्रकारचे माग असून त्यापासून तयार होणाऱ्या कपड्यावर प्रक्रिया करण्यासाठी ४५०- ५०० प्रक्रिया गिरण्या (प्रोसेसिंग मिल) कार्यरत आहेत. या वस्त्रोद्योग केंद्रामध्ये दररोज सुमारे सव्वा कोटी मीटर लांबीचे कापड तयार होत असून त्यापैकी ३० ते ४० लक्ष मीटर कापड साड्यांच्या उत्पादनासाठी वापरले जाते.
५० हजार दुकाने
किरकोळ विक्रीसाठी १००० दुकान असणारे ५० वर्षे जुने बॉम्बे मार्केट देशभर प्रसिद्ध आहे. शहरात विखुरलेल्या पद्धतीने हजारो किरकोळ विक्रीची दुकाने आहेत. अशा दुकानांमध्ये दररोज सरासरी २ हजार ते एक लाख रुपयांची उलाढाल सहजगत होत असून जून व जुलै महिना व्यतिरिक्त सुरतची बाजारपेठ गजबजलेलीच राहते असे बॉम्बे मार्केट मधील साईराज क्रिएशनचे दिलीप गुरव यांचे म्हणणे आहे.
याखेरीज वस्त्रोद्योग घाऊक विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रिंग रोडवरील १५० टेक्स्टाईल मार्केटसह शहरात एकूण असणाऱ्या २५० टेक्स्टाईल मार्केटमध्ये ५० हजार लहान मोठीदुकाने कार्यरत असल्याची माहिती बी.के एजन्सी चे संचालक कवीश मारू यांनी दिली आहे. चार, सहा, आठ व १२ नगांची एकत्रित विक्री करणाऱ्या या दुकानांमध्ये दररोज पाच लाखापर्यंत उलाढाल सर्वसाधारणपणे होत असते. साड्यांसह सुरत मध्ये गारमेंट, ड्रेस मटेरियल, मंडपासाठी लागणारे कपडे, अंतरवस्तासाठी लागणारे वस्त्र, विणकामाद्वारे (नीटिंग) तयार केलेला कपडा मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असून अशा प्रत्येक प्रकारच्या वस्त्रांसाठी व उत्पादन करणाऱ्या पद्धतच्या व्यावसायिकाचे स्वतंत्र संघटित समूह (संस्था-अससोसिएशन) कार्यरत आहेत.
उत्पादन खर्च किती, विक्री किती?
स्वस्त दराच्या साड्या सर्वसाधारणपणे साधा माग यंत्रांवर तयार केल्या जात असून या साड्यांच्या उत्पादनासाठी सरासरी १५ ते २० रुपये प्रति मीटर तर त्यावर डाईंग (छपाई) करण्यासाठी तीन ते चार रुपये प्रति मीटर इतका खर्च येतो. त्यामुळे पाच ते सहा मीटर साडी उत्पादित करण्यासाठी ८०- ९० रुपये खर्च येत असून अशा साड्यांची विक्री १०० ते १२० रुपये प्रति नग अशी घाऊक बाजारात केली जाते.
उत्पादनाची साखळी प्रक्रिया
धागा (यॉर्न) पासून तयार साड्या, ड्रेस, मटेरियल उत्पादन करणारे काही निवडक मोठे उद्योग सुरत व परिसरात असले तरीही अधिकांश ठिकाणी टप्पानिहाय साखळी पद्धतीने उत्पादन केले जाते. धाग्याला हातमाग, साधा लूम, पावरलूम, एअर जेट, वॉटर जेट व रेपियर मशीनच्या द्वारे टप्प्याटप्प्यात वस्त्र बनवले जातात. विणकाम केलेल्या या कपड्याला आवश्यकतेनुसार रंगकाम (डाईंग) रंगीत धाग्यांच्या माध्यमातून हात मागावर थेट साडी देखील तयार केली जाते. विविध भागातील नागरिकांची पसंत, आवड व मागणीप्रमाणे साडीवर डिझाईनची छपाई (प्रिंटिंग) अशा मोठ्या लांबीच्या धाग्यांचे पाच ते सहा मीटर लांबीच्या तुकड्यांमध्ये कापून त्यांची तपासणी करून सुबक पद्धतीने पॅकिंग केली जाते असे वामपम टेक्स्टाईलचे संचालक संदीप ओसवाल यांनी माहिती दिली.
सद्यस्थितीत मोठ्या रुंदीचे साड्यांचे कापड उत्पादन करणारे माग उपलब्ध झाले असून एकाच वेळी तीन साड्यांच्या ताग्याचे एकत्रित उत्पादन करण्याची व्यवस्था देखील कार्यरत झाल्याचे सांगण्यात आले.
मध्यस्थी (एजंट) ची भूमिका महत्त्वाची
साखळी पद्धतीने लाखो यंत्रमागाच्या सहाय्याने तयार होणाऱ्या वस्त्रांची विषयीची माहिती सर्वसामान्य किरकोळ अथवा घाऊक व्यापाराला नसते. त्यामुळे विशिष्ट भागातील मागणी, ग्राहकांची पसंती, सणासुदीच्या अनुषंगाने कपड्यांवरील डिझाईन तसेच नवीन डिझाईन व कपड्यातील आधुनितेच्यादृष्टीने होणारे बदल याची माहिती असणारे मध्यस्थी सुरत मधील खरेदी विक्रीच्या कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत महत्त्वाची भूमिका बजावतात. दोन टक्के दलाली (कमिशन) पद्धतीने हे व्यवहार केले जात असून सुरत मध्ये असे किमान तीन हजार माहितीगार मध्यस्थी (ऑथेंटिक ट्रेडर्स) कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा मध्यस्तांचा संदर्भ देऊन व्यवहार केल्यास संबंधित खरेदीकराना ३० ते ४५ दिवसांची उधारी दिली जात असून अन्यथा रोखाने व्यवहार करणे सुरत मध्ये अनिवार्य ठरत आहे.
जीएसटीचा प्रभाव
वस्तू सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणी नंतर सुरत मधील व्यवहारांचे स्वरूप पार बदलले आहे. जीएसटी पथके ठिकठिकाणी कार्यरत असून त्यांच्याकडून लहान गाड्यांपासून लक्झरी बस व प्रत्येक प्रवेश पॉईंटवर कसून तपासणी केली जाते. शिवाय वस्त्र उत्पादनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जीएसटी बिलचा अंतर्भाव केला गेल्याने साडी किंवा अन्य वस्तू प्रकाराची विक्री जीएसटी द्वारे करण्याकडे बहुतांश व्यापारांचा कल आहे.
मराठी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या
सुरत मधील प्रत्येक दुकानांमध्ये प्रत्येकी ४०- ५० लाख रुपये किंमतीचे वस्त्र असून यामध्ये मराठी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच खानदेशातील इतर भागांसह कोल्हापूर व राज्यातील विविध भागांमधील मराठी कर्मचारी या भागात कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
साड्यांसाठी काही प्रसिद्ध घाऊक बाजारपेठ
साड्यांच्या विक्रीसाठी सुरत मध्ये हजारो दुकान असून घाऊक व किरकोळ खरेदी विक्रीसाठी मोठमोठी टेक्स्टाईल मार्केट प्रसिद्ध आहेत. यामध्ये मिलीनियम मार्केट, जे.जे मार्केट, टेक्स्टाईल गोडाऊन, सुरत मार्केट, टीटी टॉवर, बोलावाल मार्केट, महावीर मार्केट, अभिनंदन मार्केट, अभिषेक मार्केट, व्हीटी एम मार्केट, पीटीएम मार्केट, न्यू टी.टी टॉवर, ग्लोबल मार्केट, आवाज मार्केट, श्याम मार्केट, बॉमबे मार्केट आदींचा समावेश आहे.
