राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश किसन वीर उर्फ (आण्णा) (वय ८२) यांची आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सत्यजित व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

सुरेश (आण्णा) किसन वीर हे वाईच्या जनता शिक्षण संस्थेचे व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य होते.माजी खासदार प्रतापराव भोसले व लक्ष्मणराव पाटील यांचे ते निकटवर्तीय होत. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हापरिषदेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय, आदर्शवत व शिस्तबद्ध काम करून दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यात मोठा वाटा होता.

जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी किसन वीर यांचे ते जेष्ठ चिरंजीव होत.त्यांच्या नंतर वाई तालुका व कवठे येथील राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता.त्यांच्यावर कवठे (ता. वाई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश वीर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सुरेश वीर यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ हरपला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि किसन वीर सहकारी साखर कारखाना या दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले. देशभक्त क्रांतिवीर आबासाहेब वीर यांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे चालविला. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला असून जिल्ह्याच्या सहकार, राजकीय, सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. मी सुरेश वीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वीर कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.