हर्षद कशाळकर

अलिबाग: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड पुन्हा नाराज झाले आहेत. या नाराजीतूनच कर्जत येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवल्याची चर्चा सुरु होती. अखेर खासदार सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लाडांच्या नाराजीनाम्याबाबत सारवासारव करण्याची वेळ आली.

लांडांच्या नाराजीनाम्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा असेच प्रयोग केले आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी  त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. शेवटी खासदार सुनील तटकरे यांनी मनधरणी करून त्यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडले. या नाराजीनाटय़ामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल मात्र खच्ची झाले होते. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसला. या निवडणुकीत लाड यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

निवडणुकीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी झाल्याने सुरेश लाड यांची मतदारसंघात कोंडी झाली. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले. पदभार स्वीकारल्यावरही त्यांचे नाराजीनाटय़ काही थांबले नाही. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला होता. कर्जत आणि खालापूरमधील  राजकारणाला कंटाळून, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या तक्रारींवर लक्ष देत नसल्याने पक्षाच्या जोखडात अडकून पडण्यापेक्षा आपल्याला स्वातंत्र मिळावे, यासाठी पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याचे सुरेश लाड यांनी जाहीर केले. दुसऱ्याच दिवशी सुनील तटकरे यांनी कर्जतला जाऊन लाडांची मनधरणी केली होती. या मनधरम्णीनंतर लाडांचे नाराजीनाटय़ संपुष्टात आले होते.

मात्र आता पुन्हा एकदा सुरेश लाड नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यांना कालपासून रायगड जिल्ह्यात सुरुवात झाली. यात लाड यांच्या कर्जत शहरात झालेल्या मेळाव्याला लाड अनुपस्थित राहिले. आपल्या स्वीयसाहाय्यका करवी त्यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिल्याची कुजबूज यावेळी सुरू झाली. त्यांचे फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. या मेळाव्यात स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सुरेश लाड यांचे राजकीय पुनर्वसन करा अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली.

अखेर खासदार सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्षांनी लाडांच्या नाराजीनाम्याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. लाड नाराज नाहीत आणि त्यांनी राजीनामाही दिलेला नाही असे दोघांनी आपल्या मनोगतात सांगण्याचा प्रयत्न केला. पण लाड मेळाव्याला अनुपस्थित का राहिले आणि ते संपर्कक्षेत्राच्या बाहेर का गेले याचे उत्तर काही मिळू शकले नाही.

राजकारणात प्रत्येक वेळी मनासारखे होईल असे नाही. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे. पण महामंडळाबाबत जेव्हा निर्णय होईल त्यात पहिल्या यादीत सुरेश लाड यांचे नाव असेल. लाड हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल जोमाने सुरू आहे.

  – सुनील तटकरे, खासदार

सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.

— जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस</p>