भाऊ, चार दिवस जास्त ठेव, पण बरे करून पाठव..

तीनच दिवसांपूर्वी सूत्रे स्विकारणारे जिल्हाधिकारी राऊत यांनी शनिवारी रात्री कोविड रुग्णालयात भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.

प्रतिनिधिक छायाचित्र

भाऊ, मले आढी चार दिवस जास्त ठेव, पण ठणठणीत बरे करून पाठव, असा ७० वर्षांच्या आजीने मनोदय व्यक्त करताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे भारावून गेले. त्यासाठी निमित्त घडले येथील कोविड रुग्णालयात त्यांनी रात्री दिलेल्या अचानक भेटीचे.

तीनच दिवसांपूर्वी सूत्रे स्विकारणारे जिल्हाधिकारी राऊत यांनी शनिवारी रात्री कोविड रुग्णालयात भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते. डॉक्टरांच्या कामाच्या वेळेप्रमाणे डॉक्टर, परिचारिका कामावर आहेत की नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांनी तपासले. कर्तव्यावर असणाऱ्यांना केवळ बसून राहू नका, रुग्णांच्या जवळ जाऊन तपासत राहा, त्यांना वेळेवर योग्य ते उपचार द्या, अशा सुचना केल्या. त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. काही जणांनी रुग्णालयात कंटाळा आल्याचे सांगितले. रुग्णालयात रात्री खूप उकाडा होतो. त्यासाठी काही पंखे घेण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अत्यवस्थ रुग्णांवर विशेष करून रात्री लक्ष ठेवा, जेवणाचा दर्जा चांगला ठेवा, स्वत: तपासा, असेही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला बजावले.

भेटीनंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रतिमा उंचावयाची असल्याचे सांगितले. आपल्या भरवश्यावर रुग्णांना नातेवाईकांनी ठेवावे, न घाबरता जिल्हा रुग्णालयात दाखल व्हा. मृत्यूदर पूर्ण कमी करून जनतेत विश्वास निर्माण करायचा आहे. रुग्णालयाची कार्यपद्धती बदलत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Surprise visit he made last night to covid hospital in collector abhijit raut abn