सर्वेक्षणातील निष्कर्षांनंतर अंगणवाडी आणि शाळांमध्ये व्यायामाची साधने

औरंगाबाद : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात लातूर जिल्ह्य़ात लहान मुलांची उंची वाढत नसल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. वजन आणि उंचीचे परिमाण बिघडले असल्याचे दिसून आले आहे. खुजेपण वाढीस लागण्याच्या सर्वेक्षणानंतर आता अंगणवाडी आणि शाळांमध्ये डबलबार आणि सिंगलबार बसविण्यावर भर दिला जात आहे. २०१९-२० मधील राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणातील ही आकडेवारी नियोजनाचा एक घटक मानून काम करावे लागते. वजन-उंचीचे परिमाण खरोखर किती बिघडले आहे याची माहिती घेण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असल्या तरी शाळा आणि अंगणवाडींमध्ये आता वजनाबरोबर उंची वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याचे नियोजन केले जात आहे. करोनाकाळात अंगणवाडी- शाळा बंद असल्या तरी प्रत्येक गावात किमान सुविधा निर्माण करण्यात यश मिळत असल्याचा प्रशासनाकडून केला जात आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात मुलांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले होते. राष्ट्रीय निकषापेक्षा लातूर जिल्ह्य़ात उंची वाढण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. तसेच लोह कमतरता जाणवत असल्याचे दिसून आल्यानंतर अंगणवाडीचा खाऊ शिजविण्यासाठी लोखंडी भांडय़ाचा उपयोग करण्याच्या सूचनाही करण्यात आली होती. त्याचीही अंमलबजावणी सुरू असल्याचे देवणी तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. लातूर जिल्ह्य़ात जून २०१९ ते डिसेंबर २०१९ मध्ये ९०६ घरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि १००६ महिला आणि १६० जणांच्या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वजनाच्या प्रमाणात उंची वाढत नसल्याचे दिसून आले आहे. २०१५-१६ ते २०१९ या कालावधीतील माहितीच्या राज्यात मुलांची उंची वाढण्याचे प्रमाण आणि लातूरमधील प्रमाण यात मोठी तफावत दिसून आल्यानंतर कमी उंचीवरचे डबलबार आणि सिंगलबारही बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची व्याप्ती लक्षात घेता हे आकडे चूकही असू शकतात. त्यामुळे कुपोषणासाठी घेतल्या जाणाऱ्या आकडेवारीबरोबर याचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. हे नवे बदल आता शाळा आणि अंगणवाडय़ा सुरू नसताना जाणीवपूर्वक करण्यात आले असल्याचाही दावा केला जात आहे.

मूलत: नव्या पद्धतीने कुपोषण आणि बालकांची वाढ या विषयाकडे पाहण्याची गरज असून आरोग्याच्या वेगवेगळ्या निकषाच्या आधारे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातील उंचीचा मुद्दाही आता लातूर जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यात चर्चेत आहे.

करोनाकाळात संधी म्हणून नव्याने केले जाणारे नियोजन किती उपयोगात येते हे साथरोगाचा काळ संपल्याशिवाय कळणे अवघड आहे. मात्र, शाळांच्या इमारती आणि अंगणवाडीच्या इमारतींमध्ये आता नवे बदल केले जाऊ लागले आहेत. त्याला कुटुंब सर्वेक्षणाचा आधारही घेतला जात आहे.

सर्वेक्षणातील आकडेवारी नियोजनासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे उंची वाढविण्यासाठी पारंपरिक मान्यता असणारे डबलबार-सिंगलबार अशी खेळणी तयार करून घेतली आहे. पण वजन आणि उंचीचे प्रमाणात लातूरमध्ये खरोखरच कमी आहे काय, हे कुपोषणाच्या आकडेवारीतूनही तपासले जाणार आहे. पण काही नवे बदल करत आहोत.

 अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर