गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सातत्याने ओरड सुरू आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळय़ा पद्धतीने राग व्यक्त करून झाल्यानंतरही शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रश्नी दुर्लक्ष होत होते. आता मात्र खासदार चंद्रकांत खैरे मंगळवारी रस्त्याची पाहणी करणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या रस्तेपाहणीला महत्त्व असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद शहरातील रस्ते हा प्रमुख मुद्दा असू शकतो, असे लक्षात घेऊन त्या समस्येभोवती नेते केंद्रित होत आहेत.
महापालिकेकडून रस्त्यांच्या कामात कमालीची दिरंगाई करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीतही या प्रश्नाला तोंड द्यावे लागले होते. विरोधकांनी विशेषत: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मंगळवारी रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक या रस्त्याच्या पाहणीसह शहरातील अन्य रस्त्यांची पाहणी व त्यासाठी मिळणारा निधी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे खासदार खैरे यांनी सांगितले. शहरातील काही रस्त्यांसाठी निधी आणल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही केला होता. निवडणुकांपूर्वी रस्त्यांचा प्रश्न संवेदनशीलपणे सोडवत आहोत, असा संदेश देण्यासाठी हा पाहणी दौरा असल्याचे मानले जाते.