काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे अॅड. शरद बनसोडे यांनी मानहानीकारक पराभव केल्यामुळे काँग्रेसजन पुरते घायाळ झाले आहेत. महायुतीपेक्षा काँग्रेस आघाडीअंतर्गत कट-काटशहाचे राजकारण आणि मतदारसंघाच्या मागासलेपणाचा फटका शिंदे यांना बसला. यातच मोदी लाटेकडे झालेले दुर्लक्ष शिंदे यांचा घात करणारे ठरले.
शिंदे यांनी चौथ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सोलापूर मतदारसंघाशी संपर्क ठेऊन बैठकांचा सपाटा लावला होता. दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात केंद्रीय सीमा सुरक्षा दल व केंद्रीय सीमा सशस्त्र सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्पही शिंदे यांनी अलीकडेच सोडला होता. या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांनी केले होते. या अगोदर सोलापूरजवळ त्यांनी एनटीपीसीमार्फत १३ हजार कोटी खर्चाच्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची उभारणीही हाती घेतली होती. तसेच बोरामणी विमानतळाच्या उभारणीचे कामही सुरू केले होते. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात जाऊन कृतज्ञता मेळावे घेत जनसंपर्क वाढविला असता तो चर्चेचा विषय झाला होता.
एकीकडे कृतज्ञता मेळाव्यांच्या माध्यमातून शिंदे यांचे तालुक्या-तालुक्यातून शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे प्रतिस्पर्धी भाजपच्या गोटात शिंदे यांना टक्कर देणारा उमेदवार कोठून मिळवावा, याची चिंता वाहिली जात होती. त्यातून पुढे अॅड. शरद बनसोडे यांना शिंदे यांच्या विरोधात आणले गेले. त्यांच्या उमेदवारीमुळे शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुलभ होणार असल्याचे गणित मांडले जात असताना इकडे शिंदे यांच्या काँग्रेस आघाडीमध्ये बेबनावाचे चित्र दिसत होते. दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्यासह इतर नेते मंडळींनी स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबविताना एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याचेच राजकारण केले. हीच परिस्थिती अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर व शहर मध्य या भागात पाहावयास मिळाली. प्रचारात दिसणारी उदासीनता मतदानाच्या दिवशी प्रकर्षांने जाणवली. स्थानिक अल्पसंख्याक समाजातही पोलीस मुख्यालय मशिद प्रवेशबंदी व सात तरूणांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केल्याच्या प्रकरणावरून अस्वस्थता होती. त्याचेही प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी उमटले. अल्पसंख्याकांच्या मोहल्ल्यांतून ५० टक्क्य़ांच्या आत मतदान झाल्याने काँग्रेसच्या समोरील अडचणी वाढल्या. तर, भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात संपूर्ण माहोल बदलून गेला. मोदी लाट सोलापुरात पोहोचली आणि सुशीलकुमार शिंदे यांची लढत बनसोडे नव्हे तर मोदी यांच्या विरोधातच झाली. यात शिंदे यांना धक्कादायक पराभव पत्कराला लागला. आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातही शिंदे यांची १९ हजार ५६८ मतांनी पीछेहाट झाली. सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी शिंदे यांना आघाडी घेता आली नाही. दक्षिण सोलापूर-२७ हजार ८२१, सोलापूर शहर उत्तर-४१ हजार ९१३, अक्कलकोट-३५ हजार ८०८, मोहोळ-१३ हजार ४४२ आणि पंढरपूर-मंगळवेढा-२१ हजार २९ याप्रमाणे शिंदे यांना पीछेहाट सहन करावी लागली.
निवडणूक निकालानंतर शिंदे यांचे सहकारी समजले जाणारे व अलीकडे शिंदे यांच्या विरोधात ‘शीतयुध्द’ करणारे विष्णुपंत कोठे यांची प्रतिक्रिया काँग्रेसअंतर्गत वाटमारीच्या राजकारणाची साक्ष देणारी ठरली. या पराभवामुळे काँग्रेसजनांचे पाय जमिनीवर आले. सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना आणणे महाग पडले. त्याचा फटका काँग्रेसला बसल्याचे कोठे यांनी उघडपणे सांगितले. महापालिकेत आयुक्त गुडेवार यांना शिंदे यांनी आणले असून त्यामागचा उद्देश महापालिकेतील कोठे यांच्या निरंकुश कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा असल्याचे बोलले जाते. अंतर्गत भांडणे मिटविण्यात आलेले अपयश व समन्वयाचा अभाव यामुळे शिंदे यांच्यावरील पराभवाचे संकट टळणे शक्य नव्हते. एवढेच की शिंदे यांचा पराभव निसटत्या स्वरूपात होईल, अशी भाजपसह अनेक राजकीय जाणकारांची धारणा होती. परंतु मोदी लाट, काँग्रेसविरोधी नकारात्मक वातावरण, पक्षांतर्गत बेदिली व वाटमारीचे राजकारण यामुळे पराभव अधिक धक्कादायक ठरला.