scorecardresearch

VIDEO: “शेळीने उंटाचा मुका…”, ‘सभा उधळून लावू’ म्हणणाऱ्या मनसे नेत्याला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करत सभा उधळण्याची धमकी दिली. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय.

VIDEO: “शेळीने उंटाचा मुका…”, ‘सभा उधळून लावू’ म्हणणाऱ्या मनसे नेत्याला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
सुषमा अंधारे यांची मनसेवर टीका (लोकसत्ता ग्राफिक्स)

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंलडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीका केली. यानंतर मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करत सभा उधळण्याची धमकी दिली. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. “तो म्हणतो सुषमा अंधारेंची सभा उधळेल, पण अरे काय वाघा, इथं माणसं किती, तुझ्यासोबत बोलताना माणसं किती? उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला. त्या मंगळवारी (६ डिसेंबर) उस्मानाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “मनसेचा नेता म्हणाला की, आम्ही सुषमा अंधारेंची सभा उधळून लावू, पण काल सभा उधळलीच नाही. त्यांनी आज तरी सभा उधळायला यायचं होतं. त्यांचं गपाट की काहीतरी नाव होतं. हे असेच गपाटे लोकं असतात. उगाच गप्पा ठोकत राहतात. बरं आज तो नेता जिथं कुठं असेल तर त्याला चहापाणी करा. आपण चहापाणी करून पाहुणचार केला पाहिजे.”

“उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का?”

“तो म्हणतो सुषमा अंधारेंची सभा उधळेल, पण अरे काय वाघा, इथं माणसं किती, तुझ्यासोबत बोलताना माणसं किती? उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का? असं कुठं असतं का? मला बोलायला भाग पाडू नका,” असा इशारा सुषमा अंधारे यांनी मनसेला दिला.

व्हिडीओ पाहा :

“मी कायदा पाळणारं लेकरू आहे”

“मी दहावेळा सांगते की, मी कायदा पाळणारं लेकरू आहे, मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलणारं लेकरू आहे. मी जो विचार मांडते त्या विचाराला विचाराने उत्तर द्या ना. मी आरोप किंवा टीका करत नाही, तर मुद्दे मांडते आहे, प्रश्न विचारते आहे,” असंही अंधारेंनी म्हटलं.

हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

“कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्रही…”

सीमावादावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “कन्नड वेदिका संघटनेने जे केलं ते अत्यंत अपमानास्पद आहे आणि ही घटना लाजीरवाणी आहे. महाराष्ट्र सरकारने सरकार म्हणून महाराष्ट्रासाठी काय करत आहात हा प्रश्न निर्माण होत आहे. कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्रही पाकिस्तानात नाही. भारत या संघराज्य देशातील ही दोन राज्य आहेत. मात्र, भाजपा या दोन राज्यांच्या झुंजी लावण्याचं काम करत आहे.ते अत्यंत वाईट आहे.”

“भाजपाने ठरवलं तर सीमावाद होईल का?”

“आज टोलनाक्यावर गाड्या अडवल्या गेल्या, गाड्या फोडायचा प्रयत्न झाला, त्यांच्या नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न झाला. हे ठरवून केलं गेलं. कर्नाटकमध्ये आणि केंद्रातही भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे भाजपाने असं काही होऊ नये ठरवलं तर काही होईल का? तर तसं काहीच होणार नाही,” असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.

“भाजपा ठरवून महाराष्ट्राला अस्थिर करत आहे”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “याचा अर्थ भाजपा ठरवून महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक स्थिती अस्थिर करत आहे. जितकी राजकीय अस्थिरता होईल तितके गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाहीत आणि ते उद्योगधंदे राज्याच्या बाहेर जातील. राज्य अस्थिर झालं की लोकांचं लक्ष मुख्य मुद्द्यांवरून हटवणं सोपं जाईल. शेतकरी, महिला, बेरोजगारांनी प्रश्न विचारू नये. जेव्हा कोणताच प्रश्न सुटत नाही तेव्हा भाजपाकडून असे मुद्दे उकरून काढले जातात.”

हेही वाचा : VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

“कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गावं तिकडे पाठवली जात आहेत”

“गुजरातच्या निवडणूक काळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले. आता कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकमध्ये पाठवली जात आहेत.हे घातक आहे,” असंही सुषमा अंधारे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 23:53 IST

संबंधित बातम्या