Sushma Andhare on Sunil Tatkare : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी अकाली निधन झालं. बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल ३१ जानेवारी रोजी शपथ घेतली. यावरून सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा सल्ला दिला. तसंच, त्यांच्या पोस्टमध्ये काही नेत्यांची नावं लिहून खळबळ उडवली. दरम्यान, आज पुन्हा एकदा त्यांनी एक पोस्ट रिट्वीट करून संबंधित नेत्यावर टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी काल, ३१ जानेवारी रोजी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले. “पटेल, तटकरे यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला गुंगी गुडिया समजून मनमानी करण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही दादांच्या तालमीत तयार झाला आहात. याचा ठसा उमटविण्याची संधी नियतीने तुम्हाला दिली आहे. संधी मिळाल्यास महिला सुद्धा उत्तम राज्यकर्ता होऊ शकते.”
तर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अस्थिकलशाचे पूजन केले. याबाबतचे फोटो त्यांनी आज सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवरच सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“राख थंड होण्याच्या आधी पक्ष बळकवणारे लोक तुम्ही… संवेदना नावाची कुठलीच गोष्ट शिल्लक नाही पण जनाची नाही तर किमान मनाची… !!! असे असंख्य अस्थिकलश तयार करून आता त्याचेही मार्केटिंग करणार आहात का?” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, ते तुम्हाला देखील माहिती आहे. त्यांचा आपण योग्य बंदोबस्त कराल, अशी अपेक्षा त्यांनी पोस्टमधून व्यक्त केली. विरोधक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्यास आघाडीवर असू पण, महिला म्हणून कोणी नाकेबंदी केल्यास आपल्या बरोबर असू”, असं त्या कालच्या पोस्टवर म्हणाल्या होत्या.

