Sushma Andhare targeted Deepak Kesarkar and Rupali Chakankar in the Ashok Kharat case: नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला आता वेगळीच धार आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी नेत्यांचे खरातसोबतचे फोटो दाखवून एकच खळबळ उडवून दिली. “हा भस्मासूर कोणी पोसला आणि त्याला पैसा-अडका कोणी दिला?” असा रोखठोक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मंत्र्यांचे खरातसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजप नेते अतुल सावे आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांचे अशोक खरातसोबतचे विविध कार्यक्रमांतील फोटो दाखवले. सिन्नर एमआयडीसीच्या एका कार्यक्रमात रुपाली चाकणकर यांचा सत्कार खरातच्या उपस्थितीत होत असल्याचे बॅनर त्यांनी दाखवले. “शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? तिथे चाकणकर काय करत होत्या?” असा प्रश्न अंधारे यांनी विचारला.

५०० कोटींच्या प्रकल्पाची ताकद कुठून?

अंधारे यांनी खरातच्या आर्थिक व्यवहारांवरही बोट ठेवले आहे. खरात आणि चाकणकर यांच्यातील संबंधांची तसेच त्यांच्या फोन रेकॉर्ड्सची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. “कोकणात साडेचारशे ते पाचशे कोटींचा प्रोजेक्ट सुरू आहे, एवढी ताकद खरातकडे कुठून येते?” असा सवाल करत त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ला पत्र देऊन दीपक केसरकर यांची चौकशी करण्याची अधिकृत मागणी केली आहे.

बंदुकीचा परवाना आणि फडणवीस सरकार

अंधारे यांनी सर्वात मोठा आरोप गृहखात्यावर केला आहे. अशोक खरातला २०१२ मध्ये मिळालेल्या बंदुकीच्या परवान्याचे २०२४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. “२०२४ मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. जर खरातची कृत्ये दीड वर्षांपासून माहिती होती, तर त्याच्या परवान्याचे नूतनीकरण का केले?” असा सवाल त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून गृहखाते फडणवीस यांच्याकडेच असून त्यांनी खरातला चाप का लावला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पाणी प्रश्नावर बचाव

खरातच्या ‘शिविका ट्रस्ट’ला पाणी देण्याच्या मुद्द्यावर अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांचा बचाव केला. २०२० मध्ये मिरगावच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार पिण्याचे पाणी देणे ही माणुसकी होती. रुपाली चाकणकर यांच्या शिफारसीनुसार तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अखत्यारीत हा निर्णय झाला होता, यात मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले