Sushma Andhare questions the origin of Sheetal Mhatre’s viral video : “क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे. यही तो नही “ताज” का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे… ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल'”, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. बात निकलेगी तो दूर तक चलेगी असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“राजकारणात एक शुचिता पाळावी लागते. युद्धाचे आणि राजकारणाचे काही नियम असतात. या नियमानुसार योद्धाच्या कुटुंबियांवर हल्ले करायचे नसतात. पण म्हात्रेसारख्या लोकांना त्याचं महत्त्व कळणार नाही. आम्ही इतक्या वर्षात लता ताईंबद्दल कधीच वाईट शब्द वापरले नाहीत किंवा वापरणार नाही. पण म्हात्रे लिमिट क्रॉस करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“म्हात्रेंनी या सर्वांवर बोलण्यापेक्षा म्हात्रेंचा रॅलीतील व्हिडिओ कोणी व्हायरल केला? हे त्यांनी सांगावं. राज सुर्वे नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवर हा ओरिजिनल व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र, शीतल म्हात्रे म्हणाल्या की माझा व्हिडिओ फेक आहे. मग त्यांनी ओरिजिनिल व्हिडिओ दाखवा. राज सुर्वे कोण आहे हेही सांगा. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. मला बोलायला भाग पाडू नका. म्हात्रे बाईंनी मला फुलटॉस देऊच नये. मी विकेट काढेन. ‘अब्रू इसी मे है, की कूछ चिझे पर्दे मे रहने दो.”, असा थेट इशाराच सुषमा अंधारे यांनी दिला. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
नेमकं प्रकरण काय?
२०२३ मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. मात्र, हे व्हिडिओ मॉर्फ असल्याचं सांगत शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. “मीही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सुन आहे आणि कुणाची तरी बायको आहे. यांच्याही घरात आई-बहिणी असतील. असं असूनही एखाद्या महिलेसंदर्भात एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोललं जातंय, खोटे व्हिडीओ टाकले जात आहेत. विरोधक एका महिलेबाबत असं वागू शकतात यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत”, असं शीतल म्हात्रे त्यावेळी बोलल्या होत्या.
