scorecardresearch

“खान, शेख नाव नसल्यामुळं आमच्या नवनीत अक्काचं भगव्या कपड्यातील ते गाणं..”, सुषमा अंधारेंची खोचक टीका

भगव्या रंगाच्या बिकनीवरुन दीपीका पादुकोन आणि शाहरुख खानवर टीका होत असतानाच नवनीत राणांच्या एका जुन्या गाण्याचा दाखला सुषमा अंधारे यांनी दिला.

“खान, शेख नाव नसल्यामुळं आमच्या नवनीत अक्काचं भगव्या कपड्यातील ते गाणं..”, सुषमा अंधारेंची खोचक टीका
खासदार नवनीत राणा यांच्या एका जुन्या गाण्यावरुन सुषमा अंधारे यांची टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. बीड येथील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात बोलत असताना त्या म्हणाल्या, “सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद, चर्चा होतेय. दीपीका पुदकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का?”

आपल्या भाषणात सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, माफ कर मी जास्त स्पष्ट आहे. कारण मला पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहणे जास्त योग्य वाटते. “क्युकी मेरा जमीर जिंदा है, मै मुर्दा नही हू”. हे सांगत असतानाच सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोशळ मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन दिले. मागच्या दोन अडीच वर्षात विरोधकांनी चुकीचं नरेटीव्ह लोकांपुढे मांडले. उद्धव ठाकरे अडीच वर्ष घराबाहेर पडलेच नाही, असे सांगितले गेले.पण त्यात तथ्य आहे का? हे कुणी तपासलेच नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षामधली दोन वर्ष करोनातच गेली, त्यावेळी घरातून बाहेर पडायला सर्वांवरच बंधने होती.

सुषमा अंधारे यांनी यावेळी सोशल मीडिया आणि मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले. व्हॉट्सअप विद्यापीठातून तयार झालेल्या कार्यकर्त्यांवरही टीका केली. सोशल मीडियावर विरोधकांनी एक नरेटिव्ह बाजूला केले गेले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी मागच्या आठ वर्षात एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यावर कुणीही बोलायला तयार नाही.

हे ही वाचा >> “रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा…”, अमृता फडणवीसांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचं टीकास्त्र!

योगगुरू रामदेव बाबा यांच्यावरही टीका

मध्यंतरी योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाचाही अंधारे यांनी समाचार घेतला. महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात, असं विधान रामदेव बाबांनी केलं होतं. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. या प्रकरणानंतर रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 10:18 IST

संबंधित बातम्या