केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंना अधीश बंगल्यातील बांधकाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेला अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत राणेंची याचिका फेटाळली आहे. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

“जरा कुठेही खुट्ट झालं तरी ज्येष्ठ समाजसुधारक किरीट सोमय्या फार तत्परतेने व्यक्त होतात. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी कोकणात हातात हातोडा घेऊन गेले होते. अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर किरीट सोमय्या शांत होते. ही सहनशीलता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईलपर्यंत सोमय्यांनी दाखवली आहे,” असा खोचक टोला अंधारे यांनी सोमय्यांना लगावला आहे.

हेही वाचा – मधुकर पिचडांच्या सत्तेला २८ वर्षानंतर राष्ट्रवादीने लावला सुरुंग; अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत सत्तांतर

“नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यातून वेळच…”

“आता सर्वोच्च न्यायालयाने अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सांगितलं आहे. भाजपाचे पूर्णवेळ ज्येष्ठ सामाजिका कार्यकर्ते आणि अतिक्रमण विभागाचे सहाय्यक किरीट सोमय्या आता हातोडा घेऊन अधीश बंगल्यावर जाण्याचा मुहूर्त कधी काढणार आहेत. की नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यातून वेळच मिळणार नाही,” असा टोमणाही सुषमा अंधारे यांनी सोमय्यांना मारला आहे.

हेही वाचा –

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

उच्च न्यायालयाने अधीश बंगल्यातील अनधिृकत बांधकाम पाडण्याचा निकाल दिला होता. त्याविरुद्ध नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दार ठोठावले होते. यावर आज ( २६ सप्टेंबर ) सुनावली पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ”तुम्हाला तीन महिन्यांची मुदत जास्तीत जास्त देता येईल. तीन महिन्यांमध्ये तुम्ही स्वत: हे बांधकाम काढा. जर नियमानुसार केलं नाहीतर पुढील कारवाईसाठी मुंबई पालिकेला मुभा असेल.”